शैक्षणिक पंढरी अशी ओळख असलेल्या पुणे शहराची ओळख गुन्हेगारीचे केंद्र होतेय की काय, अशी भावना पुणेकरांमध्ये निर्माण झाली आहे. गुरुवारी शिवाजीनगर येथील न्यायालयासमोर एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने दिवसाढवळ्या हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. यावरून पुण्याच्या पालकमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावरही शंका उपस्थित करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांनी त्यावर पलटवार केला. आता राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेनंतर खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पुण्यातील हल्ल्यानंतर राजकीय वाद
पुण्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने थेट सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला होता. खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे पालकत्व घेण्याची मागणी केली होती. तर आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांची तुलना थेट अजित पवार यांच्याशी करताना त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केला होता.
मिटकरींचे सवाल आणि प्रत्युत्तर
अमोल मिटकरी यांनी पलटवार करताना काही सवाल उपस्थित केले आहेत. सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मोठे करण्यासाठी त्यांच्यावर टीका करणाऱ्या या सर्वांचे काय योगदान आहे, असा सवाल मिटकरी यांनी केला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी ज्या पद्धतीने पक्ष आणि घर सांभाळले, ते का विसरता, असा सवालही मिटकरी यांनी टीकाकारांना केला आहे.
एकीकडे राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आणि माता रमाई यांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे एका महिलेच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करायची, ही भूमिका दुटप्पी असल्याचे मिटकरी म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करण्यासाठी पवार घराण्यातील दोन व्यक्तींना समोर करणे आणि त्याची वेळ यावरही मिटकरी यांनी शंका उपस्थित केली. यांचा बोलविता धनी कोण आहे, हे भविष्यात नक्कीच समोर येईल, असे ते म्हणाले. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांवर आणि पवार कुटुंबातील सदस्यांवर निशाणा साधला.
प्रतिक्रिया व्यक्त करा