न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीतही त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर आता सलग दुसऱ्या कसोटीतून त्याला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञांनी संघ व्यवस्थापनाच्या या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.
पहिली कसोटी अनिर्णित, एकच बदल
मालिकेतल्या पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या डावात संधी असूनही न्यूझीलंडला सर्वबाद करण्यात अपयश आले होते. पाहुण्या संघाने भारतीय गोलंदाजीचा खंबीरपणे सामना केला आणि सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. त्यानंतर सिराजला संघात स्थान मिळण्याची आशा होती. मात्र दुसऱ्या कसोटीसाठी भारताने संघात केवळ एक बदल केला आहे. गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला वगळण्यात आले असून त्याच्या जागी गुरनूर ब्रारला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. एखाद्या गोलंदाजाला वगळल्यास सिराजला संघात स्थान मिळेल, असे चाहत्यांना वाटत होते. पण तसे झालेले नाही.
माजी खेळाडूंची प्रतिक्रिया
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक मोहम्मद कैफ यांनी सिराजला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी समाजमाध्यमावर लिहिले की, भारताच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एकाला पुन्हा संघातून वगळण्यात आले, हे आश्चर्यकारक आहे. परदेशात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये बुमराहबरोबर सिराजचे नावही आघाडीवर असले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांनी स्वतः सिराजला जागतिक दर्जाचा गोलंदाज म्हटले होते, याकडेही कैफ यांनी लक्ष वेधले. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. सिराज आता भारताचा सहाव्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज असून त्याला संघातून वगळणे योग्य वाटत नाही, असे ते म्हणाले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सध्याच्या हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या पाच गोलंदाजांपैकी भारतीय संघात सध्या फक्त बुमराहला संधी मिळाली आहे, असेही भोगले यांनी नमूद केले. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही सिराजचा समावेश न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. शुक्रवारी त्यांनी या संघ निवडीवर पुन्हा आश्चर्य व्यक्त करत सिराजसोबतच रवींद्र जडेजाला न खेळवण्यावरही प्रश्न उपस्थित केला. जडेजा ३३ बळींसह तिसऱ्या क्रमांकावर असून चौथ्या आणि पाचव्या दिवशी त्याची फिरकी गोलंदाजी उपयुक्त ठरली असती, असे गावस्कर म्हणाले. टीव्ही अँकर सुमंत रमण यांनीही सिराजला बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर टीका केली. पहिल्या कसोटीच्या चौथ्या डावात न्यूझीलंडला जवळपास दोन दिवस बाद करू न शकलेल्या त्याच वेगवान गोलंदाजांची पुन्हा निवड झाल्याचे त्यांनी नमूद केले. भारताचा माजी गोलंदाज मुनाफ पटेल यांनीही या विषयावर समाजमाध्यमावर मत मांडले. गेल्या वर्षी ओव्हलवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्यामुळे भारताला सहा धावांनी विजय मिळवता आला होता. त्या सामन्यानंतर सिराजने सात कसोटी सामन्यांमध्ये २१ बळी घेतले आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा