केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिलिमिटेशन विधेयकात सर्व राज्यांमध्ये ५० टक्के जागा वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आता शरद पवार यांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असा असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना याबाबत केलेल्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
आव्हाड नेमके काय म्हणाले?
डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी आव्हाड यांना विचारला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. आव्हाड यांनी सांगितले की, डिलिमिटेशनची चर्चाही जेव्हा सुरू झाली नव्हती तेव्हा शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चेत त्यांना सांगितले होते की, डिलिमिटेशन हे संविधानिक असते आणि ते करावे लागते. त्याला काही पर्याय नसतो. त्यामुळे आपापले मतदारसंघ बांधायला शिका, किती दिवस असे चालायचे, असेही पवार म्हणाले होते, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.
आव्हाड म्हणाले की, शरद पवार हे त्यांचे दैवत आहेत आणि त्यांची भूमिका हीच आपली भूमिका आहे. त्यामुळे भूमिकेबाबत कुणाचाच काही प्रश्न येत नाही. चर्चा एकदम स्पष्ट आहेत की, डिलिमिटेशनला समर्थन देण्याचे निश्चित झाले आहे आणि पक्ष डिलिमिटेशनला समर्थन देणार, असे वक्तव्य आव्हाड यांनी केले.
अंतिम निर्णय सुप्रिया सुळेंचा
आठ खासदारांना घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल, असे आव्हाड म्हणाले. डिलिमिटेशन आज नाही तर उद्या, केव्हा ना केव्हा होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, रोहित पवार यांनीही शुक्रवारी दुपारी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती.
प्रतिक्रिया व्यक्त करा