पंजाबच्या राजकारणात सहा दशके महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग सध्या भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. दोन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवूनही पक्षात त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आलेली नाही, अशी त्यांची तक्रार आहे. ही नाराजी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडली. पंजाब भाजपला माझी गरज आहे की नाही, असा थेट प्रश्न त्यांनी मोदींना विचारला आहे.
पाच वर्षांची प्रतीक्षा, मात्र जबाबदारी नाही
अमरिंदर सिंग यांनी २००२ ते २००७ आणि २०१७ ते २०२१ अशी एकूण नऊ वर्षे पंजाबचे मुख्यमंत्रिपद भूषवले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र या कालावधीत पक्षाने त्यांच्याकडे कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली नाही. नुकतेच ते पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते. या भेटीत झालेली चर्चा त्यांनी माध्यमांना सांगितली. सर, तुम्हाला माझी गरज आहे का, असा सवाल मी मोदींना विचारला, असे त्यांनी सांगितले. पाच वर्षांमध्ये दिल्लीतील नेतृत्वाने किंवा पंजाबच्या कोणत्याही नेत्याने राज्याच्या राजकारणाबद्दल माझ्याशी गंभीर चर्चा केली नाही, असेही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. त्यावर पक्ष या प्रकरणात लक्ष घालत असल्याचे उत्तर मोदींनी दिल्याचे अमरिंदर यांनी सांगितले. पाच वर्षे मी प्रतीक्षा करत आहे आणि पाच वर्षांचा कालावधी कमी नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
भाजपच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह
कॅप्टन अमरिंदर यांनी भाजपच्या कार्यशैलीवरही प्रश्न उपस्थित केले. पक्षात जुन्या नेत्यांवरच अधिक विश्वास दाखवला जातो, तर नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना नेतृत्वापर्यंत पोहोचणे अवघड जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याच्या संधीही मर्यादित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बऱ्याचदा वर्षातून एकदाच भेटण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिरोमणी अकाली दलाशी युती केली आहे. अकाली दलाने २०२० मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता सहा वर्षांनंतर अकाली दल पुन्हा आघाडीत परतला आहे. निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असताना भाजपमधील माजी मुख्यमंत्र्यांची ही उघड नाराजी चर्चेचा विषय ठरली आहे.
कॅप्टन अमरिंदर कधीकाळी काँग्रेस नेतृत्वाच्या अगदी जवळचे मानले जायचे. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला ते उपस्थित होते. ऑगस्ट २०२६ मध्ये राहुल गांधी यांना भाजपमधील आवडता नेता कोण, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राहुल गांधी यांनी कॅप्टन अमरिंदर यांचा उल्लेख करत त्यांना अंकल म्हणून संबोधले होते आणि लष्कराच्या इतिहासाचे तज्ज्ञ म्हणून त्यांचे कौतुक केले होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा