जानेवारीत मकरसंक्रांती जवळ येत असताना नागपूरमध्ये पतंगबाजीची तयारी सुरू झाली आहे. मात्र यंदा नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांसाठी शहरातील पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कठोर पावले उचलली आहेत. मांजाचा वापर करणाऱ्यांपासून ते त्याची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांपर्यंत सर्वांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
वापरकर्त्याला २५ हजार, विक्रेत्याला अडीच लाखांचा दंड
प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना आढळल्यास प्रत्येक उल्लंघनासाठी २५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. विक्रेत्यासाठी ही रक्कम आणखी मोठी आहे. प्रत्येक उल्लंघनासाठी तब्बल दोन लाख पन्नास हजार रुपये दंड आकारण्यात येईल. अल्पवयीन मुलाने मांजा वापरल्यास दंडाची रक्कम त्याच्या पालकांकडून वसूल केली जाणार आहे. त्यामुळे मुलांच्या हातात नायलॉन मांजा देणाऱ्या पालकांनाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागू शकतो. दंडाची रक्कम घटनास्थळी भरली नाही, तर संबंधित व्यक्तीला पंधरा दिवसांच्या आत नोटीस बजावली जाईल. नोटीस मिळाल्यानंतरही पंधरा दिवसांत दंड न भरल्यास ही रक्कम जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांमार्फत वसूल केली जाणार आहे.
अपघात रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार सूचना
नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक गंभीर अपघात होतात. विशेषतः दुचाकीस्वारांच्या गळ्याला मांजा अडकून जीवघेण्या घटना घडतात. पादचारी आणि पक्ष्यांनाही या मांजामुळे दुखापत होते. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार नागपूर पोलीस आयुक्तालयाने सार्वजनिक सूचना जारी केली आहे. पोलीस आयुक्तांनी वर्तमानपत्रांमधून ही सूचना प्रसिद्ध करून नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे. नायलॉन मांजाचा वापर, विक्री किंवा साठवणूक होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी पोलीस हेल्पलाइन क्रमांक ११२, नागपूर सायबर पोलिसांचा व्हॉट्सॲप क्रमांक किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी पतंग उडवताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि प्रतिबंधित मांजाचा वापर टाळावा, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा