, २८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

डिलिमिटेशन विधेयक पुन्हा संसदेत; पवार-डीएमके ठरणार निर्णायक?

केंद्र सरकार डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडणार आहे. प्रत्येक राज्यात ५० टक्के जागा वाढल्यास डीएमके व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा आहे.

डिलिमिटेशन विधेयक पुन्हा संसदेत; पवार-डीएमके ठरणार निर्णायक?

केंद्र सरकार डिलिमिटेशन विधेयक दुसऱ्यांदा संसदेत मांडण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान संसदेचे अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली आहे. त्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे लोकसभेत हे विधेयक पुन्हा मांडून मंजूर करून घेण्यासाठी सरकारने पूर्ण ताकद लावल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्याचे आव्हान काँग्रेससमोर उभे राहिले आहे.

१७ एप्रिल २०२६ रोजी हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नव्हते. त्यामुळे यावेळी विधेयकात काही नव्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. डीएमके आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पाठिंब्यासाठी प्रत्येक राज्यात ५० टक्के जागा वाढवण्याची अट ठेवली होती. ही तरतूद आता नव्या विधेयकात करण्यात आली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील मित्रपक्षांमध्ये फूट पडण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्यावेळी संसदेत झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने एनडीएची २९८ मते पडली होती, तर विरोधात इंडिया आघाडीची २३० मते पडली होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे २० खासदार आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याने एनडीएचे संख्याबळ ३२४ वर पोहोचले. आता डीएमकेचे २२ खासदार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ८ खासदार एनडीएला पाठिंबा देतील, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास एकूण संख्याबळ ३५४ इतके होईल. मात्र दोन तृतीयांश बहुमत गाठण्यासाठी एनडीएला आणखी ६ खासदारांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे.

महाराष्ट्रात जागा ४८ वरून ७२ होण्याची शक्यता

प्रत्येक राज्यात ५० टक्के जागा वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खासदारांची संख्या ४८ वरून ७२ वर जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच दोन मतदारसंघांमागे एक नवा मतदारसंघ वाढणार आहे. सध्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरासरी १७ लाख मतदार आहेत. मात्र २४ जागा वाढल्यास एका मतदारसंघातील मतदारांची सरासरी संख्या १२ ते १३ लाखांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

संख्याबळाचे गणित आणि किंगमेकर पक्ष

संविधान दुरुस्तीच्या नियमानुसार मतदानावेळी सभागृहात ५२९ किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असल्यास सरकारला विधेयक मंजूर करण्याचा मार्ग आणखी सुकर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे देशातील सात पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत. वायएसआरसीपीचे ४, आपचे ३, एमआयएमचा १, अकाली दलाचे २, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलचा १, झोरम पीपल्स मुव्हमेंटचा १ आणि इंजिनीअर राशिद असे हे सात पक्ष एनडीएला पाठिंबा देतात का, यावर विधेयक मंजूर होणार की नाही हे ठरणार आहे.

एकंदरित प्रत्येक राज्यात ५० टक्के जागा वाढवण्याचा निर्णय घेऊन केंद्राने प्रादेशिक पक्षांना खुश करत डिलिमिटेशनचे जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे गेल्यावेळी विरोधात मतदान करणाऱ्या इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना सोबत ठेवण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यामुळे गेल्यावेळचीच पुनरावृत्ती होणार की भाजप यावेळी डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणार, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance