रॉयल एनफिल्डने भारतीय दुचाकी बाजारात आपली नवी अॅडव्हेंचर टूरिंग बाईक हिमालयन ७५० लाँच केली आहे. कंपनीची ही पहिली ७५० सीसी इंजिन असलेली मोटरसायकल आहे. या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ४,८९,४९० रुपये ठेवण्यात आली आहे. यापूर्वी २०२६ मधील ईआयसीएमए शोमध्ये या बाईकचे प्रदर्शन करण्यात आले होते. आता भारतीय रायडर्ससाठी तिची विक्री सुरू करण्याची तयारी कंपनीने केली आहे. लांब पल्ल्याचा प्रवास, डोंगराळ रस्ते आणि ऑफ-रोड रायडिंगचा अनुभव घेणाऱ्यांना लक्षात घेऊन ही बाईक तयार करण्यात आली आहे.
इंजिन आणि कामगिरी
या मोटरसायकलमध्ये ७४३ सीसी क्षमतेचे एअर आणि ऑइल कूल्ड पॅरलल ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ५,००० आरपीएमवर ६३ एनएम टॉर्क तयार करते. सस्पेन्शनसाठी पुढील बाजूला ४३ मिमी शोवा यूएसडी फोर्क्स असून त्यांचा ट्रॅव्हल १९० मिमी आहे. मागच्या बाजूला शोवा मोनोशॉक सस्पेन्शन दिले आहे. त्याचा व्हील ट्रॅव्हल १७५ मिमी आहे. बाईकमध्ये पुढे १९ इंच आणि मागे १७ इंच ट्यूबलेस टायर मिळतात. ब्रेकिंगसाठी ड्युअल फ्रंट डिस्क ब्रेक दिले आहेत. सीटची उंची ८१५ मिमी, ग्राउंड क्लीयरन्स २०५ मिमी आणि फ्युएल टँक १७ लिटरचा आहे.
फीचर्स आणि किंमत
फीचर्सच्या बाबतीतही हिमालयन ७५० मध्ये अनेक सुविधा आहेत. यात ६-अॅक्सिस आयएमयू, कॉर्नरिंग एबीएस, लीन सेन्सिटिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि टीपीएमएस देण्यात आले आहे. रायडर्सना पाच रायडिंग मोड्स मिळतात. याशिवाय ६० मिमी पर्यंत अॅडजस्ट करता येणारी पाच-पोझिशन विंडस्क्रीन आणि नेव्हिगेशनसह चार इंचांची गोलाकार टीएफटी स्क्रीन दिली आहे. किंमतीबाबत सांगायचे झाल्यास, अझ्टेक ग्रीन आणि टेक्टॉनिक ब्लॅक रंगातील कास्ट व्हील व्हेरिएंटची किंमत ४,८९,४९० रुपये आहे. वायकिंग ब्रॉन्झ आणि सायबेरिया व्हाइट रंगातील स्पोक व्हील व्हेरिएंटसाठी ५,१४,४९५ रुपये मोजावे लागतील. तर अंटार्क्टिक सिल्व्हर टॉप व्हेरिएंटची किंमत ६,२९,००० रुपये आहे. यात जीआयव्हीआय टॉप बॉक्स, पॅनियर्स, हीटेड ग्रिप्स, हँड गार्ड्स आणि अॅल्युमिनियम स्किड प्लेट मिळते. सर्व किंमती चेन्नई एक्स-शोरूमनुसार आहेत. हिमालयन ७५० च्या सुरुवातीच्या बुकिंगची सुविधा २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी आयोजित मोटोव्हर्स कार्यक्रमात मिळणार आहे. त्यानंतर १ डिसेंबर २०२६ पासून देशभरातील ग्राहकांना कंपनीच्या वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपवरून बुकिंग करता येईल.
प्रतिक्रिया व्यक्त करा