माण तालुक्यातील राजेवाडी तलावातून अद्यापही अहोरात्र पाणी उपसा सुरू असल्याने आगामी काही दिवसांतच हा तलाव कोरडा पडेल, अशी भीती देवापुर ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या पाणी उपशाला वीज वितरणचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. हा पाणी उपसा तात्काळ बंद करावा, यासाठी देवापुर येथील मच्छीमार सोसायटीनं तहसिलदार, पाटबंधारे विभाग आणि वीज वितरण कंपनी यांना निवेदन दिलं होतं. मात्र त्या निवेदनाला दहा दिवस उलटूनही पाणी उपसा सुरूच आहे.
आदेश देऊनही मोटारी सुरूच
या पाणी उपशावरून विद्युत प्रवाह तात्काळ बंद करण्याचे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी म्हसवड येथे झालेल्या आढावा बैठकीत वीज वितरणला दिले होते. मात्र त्यानंतरही येथील विद्युत वाहिन्या सुरू असून विद्युत मोटारीच्या साह्याने अहोरात्र पाणी उपसा सुरू आहे. राज्यात सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना माण तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेवाडी तलावातही सध्या अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणीसाठ्यावरच आगामी आठ ते नऊ महिने कसे बसे काढावे लागणार आहेत. प्रशासनाने या तलावातील सर्व विद्युत मोटारी बंद करण्याचे आदेश दिले असतानाही हा पाणी उपसा सुरूच असल्याचं चित्र दिसून येत आहे.
गावांना पिण्याच्या पाण्याची भीती
हा पाणी उपसा असाच सुरू राहिला, तर आगामी काही दिवसांतच हा तलाव पाण्याविना कोरडा पडण्याची भीती देवापुर ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सदरचा तलाव कोरडा पडल्यास देवापुर, पळसावडे, हिंगणी यासह आटपाडी तालुक्यातीलही अनेक गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही, तर पक्षांनाही पिण्यास पाणी शिल्लक राहणार नाही, अशी भीती या परिसरातील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. या निवेदनाला दहा दिवस उलटूनही हा पाणी उपसा सुरू असल्याची टीका मच्छीमार सोसायटीनं केली असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदर तलावात देवापुर येथील मच्छीमारी सोसायटीनं लाखो रुपयांचे मत्सबीज सोडले असून सोसायटीचे अनेक सदस्य याच तलावावर अवलंबून आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा