संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी डिलिमिटेशन विधेयकावरून देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची चिन्हं आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीनं या विधेयकाला सशर्त पाठिंबा देण्याचे संकेत दिल्यानं महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच या विधेयकावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
व्हीप आणि सशर्त पाठिंब्याचे संकेत
पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद खासदार अमोल कोल्हे यांनी 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या चार दिवसांच्या अधिवेशनाला हजर राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हीप बजावला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशनच्या विधेयकाला सशर्त पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, डिलिमिटेशनसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांशी संपर्क साधला असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे गैरहजर राहणार असल्यानं पवारांची राष्ट्रवादी या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आरोप-प्रत्यारोप आणि वाढता सस्पेन्स
ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्यांना 21व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार म्हटलं आहे. डिलिमिटेशनसाठी खासदारांना 150 कोटी रुपये देण्यात आल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर भाजपनं तीव्र आक्षेप घेतला असून राऊतांनी माफी मागावी, अशी भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं होतं, त्यामुळे महिला आरक्षण आणि परिसीमन हे दोन स्वतंत्र मुद्दे असून त्यांची गल्लत करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. एकीकडे डिलिमिटेशनच्या आडून 2029ची निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस आणि विरोधक करत आहेत. अशातच पवारांच्या राष्ट्रवादीनं बजावलेला व्हीप आणि सुप्रिया सुळेंची गैरहजेरी यामुळे सस्पेन्स वाढला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा