जगभरातील अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने आणि जागतिक अन्न कार्यक्रमाने आगामी सहा महिन्यांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. डिसेंबर 2026 ते मे 2027 या काळात जगातील 16 संवेदनशील भागांमध्ये उपासमारीची परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. आफ्रिकेतील काही देशांमध्ये दुष्काळ आणि भीषण अन्नटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. मागील अहवालात 13 भागांचा समावेश होता. आता ही संख्या वाढून 16 झाली आहे.
या देशांमधील युद्ध, सशस्त्र संघर्ष, नागरिकांचे विस्थापन आणि आर्थिक संकटामुळे अन्नपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे लाखो नागरिकांचे भविष्य धोक्यात आले आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेशी मदत वेळेत पोहोचली नाही तर संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सर्वाधिक धोका असलेले पाच भाग
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार सुदान, दक्षिण सुदान, सोमालिया, नायजेरियाचे काही भाग आणि येमेन या पाच ठिकाणी उपासमारीचा धोका सर्वाधिक आहे. सुदानमधील उत्तर दारफूर आणि दक्षिण कोर्दोफानमधील 13 भागांमध्ये जानेवारी 2027 पर्यंत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दक्षिण सुदानमधील काही भागातही दुष्काळाचा धोका कायम आहे.
हवामानातील बदल आणि एल निनोच्या प्रभावामुळे आफ्रिकेतील शेतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेतील काही देशांमध्ये कमी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. झिम्बाब्वेमधील 30 लाख, मलावितील 26 लाख आणि मोझाम्बिकमधील 18 लाख लोकांना आगामी काळात तीव्र अन्नटंचाईचा सामना करावा लागू शकतो. मध्य अमेरिकेतील ड्राय कॉरिडॉरमध्येही दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
मदतीसाठी निधीत मोठी घट
उपासमारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या मानवतावादी मदतीच्या निधीतही मोठी घट आहे. सर्वाधिक धोक्यात असलेल्या पाच भागांमधील अन्नसुरक्षा आणि पोषणासाठी मिळणारा निधी 2022 मधील 5.1 अब्ज डॉलरवरून 2025 मध्ये 2 अब्ज डॉलरवर आला आहे. म्हणजेच मदतीच्या निधीत 62 टक्क्यांची घट झाली आहे.
यामुळे अन्नधान्य, शेतीसाठी लागणारे साहित्य आणि गरजू कुटुंबांना मदत पोहोचवण्याच्या प्रयत्नांवर परिणाम होत आहे. निधीची ही कमतरता दूर झाली नाही तर उपासमारीचे संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा