, २८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पुण्यात हवाई दलाचा थरार; १३ हजार विद्यार्थ्यांनी पाहिली ताकद

लोहगाव हवाई दल तळावर 'नो युवर फोर्सेस' कार्यक्रमात १३ हजार विद्यार्थ्यांनी कसरती पाहिल्या. सूर्यकिरण, सारंग, सुखोईच्या प्रात्यक्षिकांनी पुणेकर मंत्रमुग्ध झाले.

पुण्यात हवाई दलाचा थरार; १३ हजार विद्यार्थ्यांनी पाहिली ताकद

आकाशात तिरंग्याचे रंग उधळत एकमेकांना छेद देणारी सूर्यकिरणची विमाने, ध्रुव हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती, हजारो फूट उंचीवरून तिरंगा फडकावत जमिनीवर उतरणारी आकाशगंगा टीम आणि सुखोई-३० एमकेआयच्या गर्जनेने दणाणून गेलेला परिसर — भारतीय हवाई दलाच्या या नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकांचा थरार शुक्रवारी पुणेकरांसह सुमारे १३ हजार शाळकरी विद्यार्थ्यांनी अनुभवला. पुण्यातील लोहगाव येथील हवाई दल तळावर आयोजित ‘नो युवर फोर्सेस’ या विशेष कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना देशाच्या हवाई सामर्थ्याची रोमांचक अनुभूती दिली.

सूर्यकिरण, सारंग आणि आकाशगंगेची कसरत

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या नऊ हॉक एमके-१३२ विमानांनी डायमंड, क्लोज ट्रेल, क्रॉसओव्हर आणि लूप यांसारख्या कसरती सादर केल्या. एकमेकांच्या जवळून उड्डाण करत अचानक दिशा बदलणे, गोलाकार फेऱ्या आणि एकमेकांना छेद देत झेपावण्याच्या कसरतींनी उपस्थितांना थक्क केले. विमानांमधून निघणाऱ्या केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या धुरातून आकाशात तिरंग्याची छटा उमटली. सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमच्या पाच स्वदेशी एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरनी डॉल्फिन लीप, वाईनग्लास आणि डायमंड फॉरमेशन सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले. आकाशगंगा स्कायडायव्हिंग टीमच्या जवानांनी सुमारे आठ हजार फूट उंचीवरून झेप घेत रंगीबेरंगी आणि तिरंग्याच्या रंगांतील पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षित उतरून उपस्थितांची मने जिंकली. सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाने व्हर्टिकल क्लाइंब, हाय अँगल ऑफ अटॅक, बॅरल रोल आणि वेगवान दिशाबदल यांसारख्या कसरती सादर केल्या.

विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची प्रेरणा

तरुणांमध्ये भारतीय सैन्यदलांविषयी आकर्षण निर्माण व्हावे, देशसेवेची भावना रुजावी आणि सशस्त्र दलांमध्ये करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहर व परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. हवाई प्रात्यक्षिकांसह लढाऊ विमाने, रडार प्रणाली, संरक्षण उपकरणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना हवाई दलाच्या कार्याची जवळून ओळख करून घेता आली. कार्यक्रमात विमानांची कार्यपद्धती, रडार प्रणाली, लष्करी उपकरणे, वैमानिकांचे प्रशिक्षण आणि हवाई दलातील करिअरच्या संधींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सांगितले की, आतापर्यंत केवळ टीव्हीवर किंवा मोबाईलमध्ये लढाऊ विमाने पाहिली होती, पण आज प्रत्यक्ष डोळ्यांसमोर सूर्यकिरणची विमाने आणि सुखोईचा थरार पाहून अंगावर काटा आला; आकाशात उमटलेले तिरंग्याचे रंग कधीच विसरता येणार नाहीत. लोहगाव हवाई दल तळाचे प्रमुख एअर कमोडोर सतबीर सिंग राय यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे शाळकरी मुलांमध्ये लहानपणापासूनच देशभक्तीची भावना रुजण्यास आणि त्यांना भारतीय सैन्यदलांच्या कार्याची जवळून ओळख होण्यास मदत होते.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance