शिवाचे उग्र रूप मानले जाणारे काळभैरव यांची जयंती यंदा १ डिसेंबर २०२६ रोजी साजरी होणार आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारा हा दिवस काळभैरवांना समर्पित असतो. काळभैरव हे काशीचे कोतवाल म्हणून ओळखले जातात. त्यांची पूजा केल्याने भीती दूर होते आणि नकारात्मकतेवर मात करण्याची शक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे.
पंचांगानुसार यंदा मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी १ डिसेंबर रोजी येत आहे. ही तिथी १ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजून ११ मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री ११ वाजून २२ मिनिटांनी संपेल. या दिवशी निशिता मुहूर्तावर केलेली पूजा विशेष फलदायी मानली जाते.
काळभैरवांच्या उत्पत्तीची कथा
धार्मिक ग्रंथांनुसार एकदा ब्रह्मदेवाला आपल्या सृजनशक्तीचा अहंकार झाला. त्यांना वाटू लागले की त्यांच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. एवढेच नव्हे तर त्यांना शिवाच्या श्रेष्ठत्वाबद्दलही शंका वाटू लागली. हा अहंकार पाहून शिवाच्या क्रोधातून आणि तेजातून काळभैरवांचा जन्म झाला. काळभैरवांनी ब्रह्मदेवाचे पाचवे शीर कापले आणि त्यामुळे त्यांच्यावर ब्रह्महत्येचा आरोप आला.
या पापातून मुक्त होण्यासाठी काळभैरव तिन्ही लोकांत फिरले, पण ब्रह्मदेवाचे कापलेले मस्तक त्यांच्या हातातून सुटत नव्हते. काशीला पोहोचल्यावर ती कवटी त्यांच्या हातातून गळून पडली आणि ते ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त झाले. तेव्हापासून काळभैरव काशीचे कोतवाल म्हणून तिथेच राहतात, असे मानले जाते.
पूजेची पद्धत कशी आहे?
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. पूजेची जागा गंगाजलाने शुद्ध करून उपवास किंवा पूजेचा संकल्प करावा. स्वच्छ आणि उंच पाटावर काळभैरवांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. सर्वप्रथम गणेश आणि शिवाचे ध्यान करावे.
मूर्तीला गंगाजल, दूध, दही, मध आणि तुपाने अभिषेक करावा. त्यानंतर चंदनाचा लेप लावून कुंकू किंवा शेंदूर लावावे आणि फुले व पुष्पहार अर्पण करावेत. देवतेसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. काळे तीळ, काळी उडीद डाळ, सुपारी, लवंग आणि नारळ अर्पण करावेत. नैवेद्य म्हणून जिलेबी, इमरती, गूळ किंवा लाडू द्यावेत. ॐ कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करावा.
प्रतिक्रिया व्यक्त करा