लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने गुरुवारी स्वतंत्र बुलेटिन जारी केले आहे. त्यात आगामी चार दिवसीय संसदीय सत्राची रूपरेषा समोर आली आहे. या सत्रात प्रश्नकाळ आणि शून्यकाळ नसतील. एप्रिल महिन्यात दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आपटले होते. पण आता समीकरणे बदलताना दिसत आहेत. विरोधी बाकांवरील द्रमुक आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून अनुकूल भूमिका समोर आली आहे.
राज्यसभेतील आकडेवारी सरकारसमोर आव्हान
राज्यसभेत एकूण २४४ सदस्य आहेत. त्यातील एक जागा रिक्त आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला या वरिष्ठ सभागृहात १६३ मतांची आवश्यकता आहे. तर सरकारकडे अवघी १५४ मते आहेत. म्हणजेच सरकारला ९ मतांची गरज आहे. त्यासाठी विरोधी बाकांवरील आणि काही इतर पक्षांची मदत लागणार आहे. बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस पार्टीचे अनुक्रमे पाच आणि चार सदस्य आहेत. हे दोन्ही पक्ष सध्या कोणत्याही आघाडीत नाहीत.
द्रमुक आणि राष्ट्रवादीच्या अटी
लोकसभेत द्रमुकचे २२ खासदार आहेत. राज्यसभेत या पक्षाचे ८ सदस्य आहेत. द्रमुकने या विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण त्यासाठी पक्षाने अटही घातली आहे. राज्यांतील लोकसभेच्या जागांची संख्या त्याच प्रमाणात वाढवण्याचे लेखी आश्वासन पक्षाला हवे आहे. द्रमुकच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, विधेयकाच्या भाषेत बदल केला तर आम्ही निश्चित पाठिंबा देण्यास तयार राहू. आम्ही उद्या अथवा त्यानंतर लगेचच बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवू, असेही त्यांनी म्हटले आहे.
द्रमुक हा तसा काँग्रेसचा सहकारी पक्ष आहे. पण तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने द्रमुकची साथ सोडली. विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने तामिळगा वेत्री कळघम या पक्षाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर भाजपने डाव टाकला आहे.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवार घेतील ती भूमिका मान्य असेल, असे मत राष्ट्रवादीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी मांडले. विधेयकावर पक्षाच्या भूमिकेला पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा राहील, असेही त्यांनी व्यक्त केले. पवारांचा पक्ष हा इंडिया आघाडीतील महत्त्वाचा पक्ष आहे. त्यांचे लोकसभेत ८ खासदार आहेत. ताज्या माहितीनुसार, खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे. संसदेच्या या विशेष चार दिवसीय अधिवेशनात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एप्रिलमध्ये पक्षाने या विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकासंदर्भात अटींची माहिती दिली होती. त्यानुसार, महिला आरक्षण लागू व्हायला पाहिजे. सर्व राज्यांतील लोकसभेच्या जागांची संख्या ५० टक्क्यांनी वाढवली गेली पाहिजे. मतदारसंघाच्या सीमा नव्याने निश्चित करण्यासाठी जो परिसीमन आयोग स्थापन होणार आहे, त्यात विरोधी पक्षांनाही पुरेसे प्रतिनिधित्व मिळायला हवे, अशा एनसीपीच्या अटी आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा