संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. डिलिमिटेशन विधेयक सादर करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी पक्षाच्या आतूनच या मुद्द्यावर वेगळा सूर उमटला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेतील आपल्या सर्व खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या काळात सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना खासदारांना देण्यात आल्या आहेत. पक्षाची भूमिका सर्वांनी पाळावी, असेही व्हीपमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी डिलिमिटेशनवर नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्हीप जारी झाल्यानंतर पक्षात दोन मतप्रवाह
व्हीप जारी होताच राष्ट्रवादीत डिलिमिटेशनवरून दोन वेगवेगळे विचार पुन्हा चर्चेत आले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांनी या मुद्द्यावर उघड आक्षेप घेतला आहे. दोन वेगवेगळ्या विषयांची गल्लत करून ते कुणाच्या तरी हाती खेळण्याची गंभीर चूक करू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
नताशा आव्हाड यांचा आक्षेप नेमका काय?
नताशा आव्हाड म्हणाल्या की, भाजप पुन्हा एकदा या मुद्द्याचा वापर मनमानी पद्धतीने आणलेल्या सीमांकन विधेयकाचे समर्थन करण्यासाठी करत आहे. हे आपल्या लोकशाहीवर थेट हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सीमांकन विधेयकावरील चर्चेत महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महिला आरक्षण विधेयक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मंजूर झाले होते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याची संधी भाजपकडे होती, असेही नताशा आव्हाड यांनी नमूद केले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा