बाळ जन्माला आल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण असते. पण त्यानंतर कधी कधी बाळाला कावीळ झाली आहे, असे कळवले जाते आणि घरात काळजी निर्माण होते. इतक्या लहान बाळाला कावीळ कशी झाली, असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पण प्रत्येक कावीळ धोकादायक असते का? आणि नेमके कधी सावध होण्याची गरज असते? याची माहिती असणे आवश्यक आहे.
## बहुतेक वेळा कावीळ नैसर्गिक बदलांचा भाग
तज्ज्ञांच्या मते, नवजात बाळांमध्ये कावीळ होणे ही अत्यंत सामान्य बाब आहे. जगभरातील अनेक बाळांना जन्मानंतरच्या पहिल्या आठवड्यात कावीळ होते. बहुतेक वेळा ती शरीरात होत असलेल्या नैसर्गिक बदलांचा भाग असते आणि काही दिवसांत कमी होते. मात्र काही प्रकरणांमध्ये रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण इतके वाढू शकते की त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. उपचार करायला उशीर झाल्यास मेंदू आणि मज्जासंस्थेवरही परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे कोणती कावीळ केवळ निरीक्षणाची गरज असलेली आहे आणि कोणत्या काविळीवर तातडीच्या उपचारांची गरज आहे, हे पालकांना समजणे महत्त्वाचे ठरते.
## ही लक्षणे दिसली तर सावध व्हा
कावीळ सुरुवातीला चेहरा आणि डोळ्यांपासून दिसू लागते. मात्र पिवळेपणा छाती, पोट आणि हात-पायांपर्यंत झपाट्याने पसरू लागला, बाळ दूध पिणे कमी करू लागले, खूप सुस्त झाले किंवा जागे करणे कठीण जाऊ लागले, तर ते धोक्याचे संकेत असू शकतात. विशेषतः अकाली जन्मलेली बाळे, कमी वजनाची बाळे आणि आई-बाळाच्या रक्तगटात विसंगती असलेली प्रकरणे यांच्यावर अधिक बारकाईने लक्ष ठेवावे लागते, असे तज्ज्ञ सांगतात. अनेक कुटुंबांमध्ये अजूनही सूर्यप्रकाश हा काविळीवरचा घरगुती उपाय मानला जातो. मात्र तज्ज्ञ सांगतात की गंभीर कावीळ ओळखण्यासाठी आणि योग्य उपचार सुरू करण्यासाठी वैद्यकीय तपासणीला पर्याय नाही. बहुतांश बाळे काविळीतून कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बाहेर पडतात, पण काही वेळा वेळीच उपचार न मिळाल्यास त्याचे परिणाम कायमस्वरूपी ठरू शकतात. म्हणूनच नवजात कावीळ ही केवळ पिवळसर त्वचेची गोष्ट नसून, वेळेवर ओळख आणि योग्य उपचार करणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा