थंडीच्या दिवसांत फिरायला जाण्याची इच्छा असलेल्यांसाठी विदर्भ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. काश्मीर किंवा परदेशात जाण्याचा खर्च न करता नागपूरच्या आसपासच डोंगर, जंगल, प्राचीन मंदिरे आणि तलावांचा अनुभव घेता येतो. हिवाळ्यात इथे कडाक्याची थंडी नसते आणि उन्हाचा त्रासही नसतो. सकाळच्या गुलाबी थंडीत जिप्सी सफारी आणि संध्याकाळी तलावाकाठी चहा-भजी असा आनंद इथे मिळतो. नागपूरपासून दोन-तीन तासांच्या अंतरावर अशी सहा ठिकाणे आहेत.
नागपूरजवळची सहा ठिकाणे
चिखलदरा हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे. खोल दऱ्या, झरे, कॉफीचे मळे आणि सगळीकडे पसरलेली हिरवळ हे इथले वैशिष्ट्य आहे. इथून गाविळगड किल्ला, भीमकुंड आणि पंचबोल पॉइंट पाहता येतात. नागपूरपासून चिखलदरा २३० किलोमीटर अंतरावर आहे. अमरावती मार्गे बस किंवा स्वतःच्या गाडीने जाता येते. जवळचे रेल्वे स्थानक अमरावती आहे आणि तिथून टॅक्सी मिळते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ इथे जाण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वांत जुने आणि मोठे व्याघ्र प्रकल्प आहे. थंडीच्या सकाळी वाघ पाणी प्यायला बाहेर येतात, त्यामुळे त्यांना पाहण्याची शक्यता जास्त असते. जिप्सी सफारी आणि छायाचित्रणासाठी थंडीचा काळ उत्तम मानला जातो. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कुटुंबासह ताडोबाला नेहमी येतात आणि हे त्यांचे आवडते ठिकाण आहे. नागपूरपासून ताडोबा १४० किलोमीटरवर आहे. चंद्रपूरला जाणारी बस किंवा टॅक्सीने मोहरली गेट गाठता येते. चंद्रपूर हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.
पेंचचे जंगल मोगलीच्या कथेमुळे ओळखले जाते. गर्द झाडी, नद्या आणि वाघांची डरकाळी हे या जंगलाचे वैशिष्ट्य आहे. इथे बिबट्या, रानकुत्रे आणि ३०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात. पहाटे जंगलात फेरफटका मारणे हा वेगळाच अनुभव असतो. नागपूरपासून पेंच केवळ ८० ते ९० किलोमीटर अंतरावर आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात इथे जाणे चांगले मानले जाते.
रामटेकच्या डोंगरावर प्राचीन मंदिर आहे. वनवासाच्या काळात भगवान राम काही काळ इथे राहिले होते, अशी मान्यता आहे. डोंगरावरून संपूर्ण शहर दिसते. जवळच असलेल्या खिंडसी तलावावर हिवाळ्यात नौकाविहार, जलक्रीडा आणि तलावाकाठी सहलीचा आनंद घेता येतो. नागपूरपासून रामटेक ५० किलोमीटर अंतरावर आहे. नागपूर बस स्थानकावरून दर अर्ध्या तासाला बस मिळते.
मार्कंडा हे वैनगंगा नदीच्या किनारी असलेले प्राचीन मंदिर आहे. बारीक नक्षीकामासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे आणि त्याला विदर्भाचे खजुराहो असेही म्हटले जाते. मार्कंडा चंद्रपूर जिल्ह्यात असून नागपूरपासून २०० किलोमीटर अंतरावर आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पसरलेला आहे. शांतता आणि पक्षीनिरीक्षण आवडणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. थंडीत नवेगाव धरणाच्या जलाशयावर दूरवरून स्थलांतरित पक्षी येतात. इथली सफारी ताडोबापेक्षा स्वस्त मिळते आणि गर्दीही कमी असते. नागपूरपासून नवेगाव सुमारे १५० किलोमीटरवर आहे.
फिरायला जाण्यापूर्वी लक्षात ठेवा
ताडोबा, पेंच आणि नवेगावमध्ये थंडीच्या दिवसांत सफारी २० ते २५ दिवस आधीच भरते, त्यामुळे आधीच ऑनलाइन नोंदणी करा. वाघ पाहायचा असेल तर पहाटे साडेसहाची सफारी सर्वोत्तम मानली जाते. उघड्या जिप्सीत थंडी वाजते, त्यामुळे गरम कपडे सोबत ठेवा. जंगलातील गावांमध्ये कधी कधी मोबाईल नेटवर्क मिळत नाही, त्यामुळे थोडी रोख रक्कम सोबत ठेवा. विदर्भात आल्यानंतर सावजी चिकन, तर्री पोहा आणि मटण यांचा आस्वाद घ्या. शाकाहारी लोक बटाटी भरीत आणि भाकरी चाखू शकतात.
प्रतिक्रिया व्यक्त करा