एक काळ असा होता, जेव्हा दूरदर्शनवरील मालिका संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहिल्या जायच्या. त्या काळातील अनेक कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. अशीच एक ऐतिहासिक मालिका म्हणजे ‘भारत एक खोज’. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे शीर्षक गीत ऋग्वेदातील नासदीय सूक्तावर आधारित होते. भारतीय इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या या मालिकेबद्दल जाणून घेऊया काही खास गोष्टी.
३८ वर्षे जुनी ऐतिहासिक मालिका
‘भारत एक खोज’ ही मालिका १९८८ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होण्यास सुरुवात झाली. या मालिकेत भारताचा जवळपास ५,००० वर्षांचा इतिहास दाखवण्यात आला होता. १९८८ ते १९८९ या काळात या मालिकेचे एकूण ५३ भाग प्रसारित झाले. या मालिकेची निर्मिती प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी केली होती. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर ही मालिका आधारित होती. प्राचीन भारतापासून ते १९४७ मधील स्वातंत्र्यापर्यंतचा प्रवास यात दाखवण्यात आला.
ऋग्वेदातील नासदीय सूक्त
या मालिकेचे शीर्षक गीत ‘सृष्टी से पहले सत नहीं था, असत भी नहीं’ या ओळींनी सुरू होते. या ओळी ऋग्वेदातील नासदीय सूक्तावर आधारित होत्या. सृष्टीची निर्मिती कशी झाली, याविषयीचे तत्त्वज्ञान या गीतातून मांडण्यात आले होते. या मालिकेत ५०० हून अधिक कलाकारांनी काम केले होते. ओम पुरी, नसीरुद्दीन शाह आणि इरफान खान यांसारखे दिग्गज कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसले. त्यांच्या अभिनयामुळे मालिकेला विशेष लोकप्रियता मिळाली. ‘भारत एक खोज’ ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती. भारतीय संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक घटनांची माहिती तिने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे आजही या मालिकेची आठवण आवर्जून काढली जाते.
प्रतिक्रिया व्यक्त करा