नागपुरात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी गायलेल्या एका गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. परिषदेची सुरुवात त्यांनी थेट एका गाण्याने केली. हे गाणे हनुमान चालिसाच्या चालीवर रचलेले मोदी चालीसा असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगितले जात असून, दिपके यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
या वादावर प्रश्न विचारले असता दिपके चांगलेच भडकले. त्यांनी उलट आरोप करत म्हटले की, सोशल मीडियावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच प्रसिद्धी दिली जाते. विरोधी नेत्यांच्या पोस्ट मेटाकडून काढल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. इंस्टाग्रामवरील तब्बल ५० लाख पोस्ट काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. इंस्टाग्राम आणि मेटावर पंतप्रधान मोदी आणि मोदी चालीसा यांनाच स्थान दिले जात असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यावेळी आशुतोष रांका हेही उपस्थित होते.
गायकाला अटक करण्याची मागणी
दिपके यांनी गाणे गाणाऱ्या गायकावरही थेट निशाणा साधला. ज्या गायकाने हे गाणे म्हटले, त्याला तात्काळ अटक करून तुरुंगात टाकावे, अशी मागणी त्यांनी केली. हे गाणे त्याने कसे बनवले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एवढेच नाही तर भाजपच्या सोशल मीडियावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. हे गाणे भाजपच्या सोशल मीडियावरूनच उचलल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात
सीजेपीवर यापूर्वीही सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान सीता के पती अशा घोषणा देण्यात आल्या होत्या आणि त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. आता या नव्या गाण्यामुळे वाद आणखी पेटला असून, दिपके अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा