शेकडो वर्षांची परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारे चिंदर गाव पुन्हा एकदा ऐतिहासिक गावपळणीसाठी सज्ज झाले आहे. श्री देव रवळनाथाच्या कौलाने गावपळणीचा मुहूर्त निश्चित झाला असून, येत्या २ डिसेंबर २०२६ पासून संपूर्ण गाव तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी वेशीबाहेर जाणार आहे. या काळात सुमारे साडेसात हजार लोकसंख्येचे चिंदर गाव निर्मनुष्य होणार आहे.
कौल कसा मिळाला
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, बुधवार २५ नोव्हेंबर रोजी बारा-पाच मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री देव रवळनाथाचा कौल-प्रसाद घेण्यात आला. देवाने गावपळणीसाठी कौल दिल्यानंतर पारंपरिक प्रथेनुसार २ डिसेंबरपासून गावपळणीला सुरुवात करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे आता गावात घराघरांत तयारीची लगबग सुरू होणार आहे.
तीन दिवस गावाबाहेर
गावपळणीच्या काळात चिंदरमधील ग्रामस्थ तीन दिवस आणि तीन रात्री गावाच्या वेशीबाहेर वास्तव्यास राहणार आहेत. आचरा, त्रिंबक, मसुरे, वायंगणी, बांदिवडे आदी परिसरांमध्ये गावकऱ्यांकडून राहुट्या उभारण्यात येणार आहेत. घरांना कुलूप लावून संपूर्ण कुटुंबासह गावाबाहेर मुक्कामाला जाण्याची तयारी ग्रामस्थ करणार आहेत. या काळात केवळ माणसेच नव्हे, तर घरातील गुरे-ढोरे, कुत्रे, मांजरे, कोंबड्या यांनाही सोबत नेण्याची परंपरा आहे. त्यामुळे गावातील घरे, रस्ते आणि परिसर तीन दिवसांसाठी ओस पडणार आहेत.
चिंदर गावात दर तीन ते पाच वर्षांनी पारंपरिक पद्धतीने गावपळण केली जाते. या परंपरेला ग्रामस्थांच्या धार्मिक श्रद्धेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. श्री देव रवळनाथाच्या कौलानुसार गावपळणीचा मुहूर्त निश्चित केला जातो आणि त्यानंतर संपूर्ण गाव या सामूहिक सोहळ्यासाठी सज्ज होते. आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव वाढत असतानाही चिंदरवासीयांनी शेकडो वर्षांची ही परंपरा आजही श्रद्धेने जपली आहे. या परंपरेत हिंदू बांधवांसोबतच ख्रिश्चन समाजातील ग्रामस्थही उत्साहाने सहभागी होतात.
प्रतिक्रिया व्यक्त करा