आक्रमणाचा वेग, संरक्षणातील संयम आणि सांघिक ताकदीची अभेद्य भिंत — या त्रिसूत्रीच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुलींनी ४५ व्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदकावर दिमाखात मोहोर उमटवली. अंतिम सामन्यात ओडिशाला २७-१९ अशा आठ गुणांनी नमवत महाराष्ट्राने आपले २७ वे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या मुलींनी सलग १२ व्या विजेतेपदाची ऐतिहासिक कामगिरी नोंदवत राष्ट्रीय खो-खोवरील आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले.
पहिल्या डावातच निर्णायक आघाडी
विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात ओडिशाने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारले. महाराष्ट्राने आक्रमणाची संधी साधत सुरुवातीपासूनच वेगवान खेळ केला. पहिल्या डावात १२ गुण आणि ३ बोनस गुणांची कमाई करत महाराष्ट्राने एकूण १५ गुण नोंदवले. महाराष्ट्राच्या आक्रमणापुढे ओडिशाला पहिल्या डावात केवळ ६ गुणांवर समाधान मानावे लागले. पहिल्याच डावात महाराष्ट्राने निर्माण केलेली ही आघाडी सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरली.
दुसऱ्या डावातही पकड कायम
पहिल्या डावातील आघाडी मिळाल्यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही खेळावरील पकड सैल होऊ दिली नाही. आक्रमणात १० गुणांची कमाई करत विजयाच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकले. ओडिशानेही दुसऱ्या डावात १० गुण मिळवत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र पहिल्या डावातील पिछाडी भरून काढणे त्यांना शक्य झाले नाही. या डावात महाराष्ट्राने २, तर ओडिशाने ३ बोनस गुण मिळवले. परिणामी महाराष्ट्राने २७-१९ अशी आठ गुणांची विजयी आघाडी कायम राखत सुवर्णपदकावर कब्जा केला.
महाराष्ट्राच्या विजयात आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर खेळाडूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्नेहा लामकाने (२.३० मिनिटे संरक्षण व ६ गुण), धनश्री कंक (२ मिनिटे संरक्षण व ४ गुण), मैथिली पवार (१.३० मिनिटे संरक्षण व ६ गुण), अनुष्का ताम्हाणे (१.२० व २.१० मिनिटे संरक्षण), श्वेता नवले (१.४० मिनिटे संरक्षण), गुड्डी राठोड (१.१० मिनिटे संरक्षण) आणि प्रणिती जगदाळे (४ गुण) यांनी प्रभावी खेळ करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
ओडिशाच्या खेळाडूंनीही प्रतिकाराची पराकाष्ठा केली. तृप्तीरेखा बारीक (१.३० मिनिटे संरक्षण व ४ गुण), सुभाश्री मल्लिक (१.२५ मिनिटे संरक्षण व ४ गुण), लिसारानी रैना (१.३० व १.२० मिनिटे संरक्षण), चिन्मयी प्रधान (१ मिनिट संरक्षण व २ गुण), रक्तिमा भांडा (२.०५ मिनिटे संरक्षण व २ गुण), कादिला मेनका (१.०५ मिनिटे संरक्षण व २ गुण) आणि सुभालक्ष्मी नाथा (१.०५ मिनिटे संरक्षण) यांनी चांगली कामगिरी केली. मात्र महाराष्ट्राच्या आक्रमणाचा वेग आणि सांघिक समन्वय रोखण्यात त्यांना यश आले नाही.
महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी या विजयाचे श्रेय खेळाडूंच्या मेहनतीला, जिद्दीला आणि उत्कृष्ट सांघिक समन्वयाला दिले. सलग १२ वे आणि एकूण २७ वे राष्ट्रीय विजेतेपद मिळवणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले असून, आगामी स्पर्धांमध्येही महाराष्ट्राच्या मुली अशीच विजयी घोडदौड कायम ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा