दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांचा आधार घेऊन नोकरीतील सवलती आणि सुविधांचा लाभ घेतल्याचा संशय असलेल्या शिक्षकांवर पुणे जिल्हा परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वैद्यकीय फेरतपासणीत दिव्यांगत्वाचे प्रमाण अत्यल्प आढळलेल्या पाच शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. अन्य ४१ शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे लाभ बंद करून त्यांची दुर्गम भागातील शाळांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या लाभांची वसुलीही केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बुधवारी ही माहिती दिली.
## फेरतपासणीत काय आढळले
जिल्ह्यातील सुमारे ४५० शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची औंध जिल्हा रुग्णालय आणि ससून रुग्णालयात वैद्यकीय फेरतपासणी करण्यात आली. यामध्ये पाच शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी, तर अन्य ४१ शिक्षकांचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाच शिक्षकांची विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशीत प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित ४१ शिक्षकांचे दिव्यांगत्वाशी संबंधित लाभ बंद करून त्यांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये नियुक्त केले जाणार आहे.
## तक्रारीनंतर कारवाई
जिल्हा परिषदेकडे ४०९ शिक्षकांनी दिव्यांग असल्याची प्रमाणपत्रे सादर केली होती. मात्र प्रमाणपत्रांच्या सत्यतेबाबत दिव्यांग संघटनांनी आक्षेप घेत फेरतपासणीची मागणी केली होती. त्यानुसार ही फेरतपासणी करण्यात आली. फेरतपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी अधिक कडक होण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा