, २६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जुन्नरमध्ये बिबट्याचा हल्ला; शेतातील महिलेचा जागीच मृत्यू

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भात कापणी करताना बिबट्याने सासू-सुनेवर हल्ला केला. या हल्ल्यात ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर सून गंभीर जखमी झाली आहे.

जुन्नरमध्ये बिबट्याचा हल्ला; शेतातील महिलेचा जागीच मृत्यू

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बुधवारी दुपारी बिबट्याने शेतात भात कापणी करणाऱ्या दोन महिलांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ५५ वर्षीय भीमाबाई जिजाभाऊ भोईर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची सून अश्विनी सुरेश भोईर (३५) गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात, पिंपळगाव जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भोईरवाडी येथे घडली.

शेतात काम करताना अचानक हल्ला

भीमाबाई भोईर आणि त्यांची सून अश्विनी भोईर या दोघी शेतात नेहमीप्रमाणे भात कापणी करत होत्या. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दोघींवर झडप घातली. बिबट्याने खाली बसून काम करणाऱ्या भीमाबाई भोईर यांच्या गळ्याला आपल्या जबड्यात पकडले. त्यामुळे गळ्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अश्विनी भोईर या घाबरून पळताना पडल्याने त्यांच्या हाताचे हाड मोडले आणि त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासणी सुरू केली आहे.

परिसरात भीतीचे वातावरण

बिबट्याच्या या हल्ल्यामुळे भोईरवाडी आणि पिंपळगाव जोगा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले आणि मानवी जीवितहानी वाढत असताना वनविभाग आता काय उपाययोजना करणार, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. या भागात बिबट्यांचा प्रादुर्भाव गेली अनेक वर्षे आहे आणि त्यांची संख्या अलिकडे प्रचंड वाढली आहे. उसाच्या मळ्यात बिबट्याची मादी पिल्लांना जन्म देत असल्याने आणि त्यांचा जन्मदरही जास्त असल्याने बिबटे आता भक्ष्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकांत ठिकाणी काम करताना नेहमी हातात काठी घेऊन पहाऱ्यासाठी एखाद्या व्यक्तीला उभे राहण्यास सांगावे आणि सावध राहूनच योग्य सुरक्षेत शेतीची कामे करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance