जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मुक्ताईनगर मतदारसंघाला एकही जागा मिळाली नाही. यामुळे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीत आपल्याला गाफील ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सर्व आमदारांना जागा, मला मात्र नाही
महायुतीतील शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एक ते दोन जागा देण्यात आल्या. मात्र आपल्याला एकही जागा मिळाली नाही, असे पाटील म्हणाले. सर्व आमदारांना एक-एक जागा देण्यात आली, मला न दिल्याने माझ्या मनात खंत आहे, दुःख आहे, असे त्यांनी सांगितले. मुक्ताईनगरची जागा शिवसेनेला न मिळता भाजपच्या रक्षा खडसे यांना मिळाल्याने त्यांची नाराजी आणखी वाढली. ही जागा भाजपला दिली जात असेल तर बोदवडची जागा तरी आपल्याला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र तीही मान्य झाली नाही. मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही आमदारांमधील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तरीही तोडगा निघाला नाही.
यापुढे अपक्ष लढणार
मी ज्यांच्या विरोधात लढतो, ते लोक त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवतात, असे पाटील म्हणाले. शिवसेनेकडून आणि नेत्यांकडून आपल्याला पुन्हा मदत होईल, अशी अपेक्षा आता राहिलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांना ही जागा मिळाली. माझ्या पदरी ती पडली नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना किंवा आपल्या नेत्यांना भेटण्याची आता आपली मुळीच इच्छा नाही, असे त्यांनी सांगितले. कुणाजवळ दुःख मांडायचं आणि रडत जायचं, हे काम माझं राहिलेलं नाही. यापुढेही अपक्ष लढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जागा न मिळाल्याने संशोधन करण्याचा हा विषय आपल्यासाठी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा