उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरीत शिवसेनेच्या शाखेतच पक्षांतर्गत धुसफूस समोर आली आहे. चेंदणी कोळीवाड्यातील एका कार्यक्रमानिमित्त कोपरीच्या शिवसेना शाखेत गेलेले खासदार श्रीकांत शिंदे यांना शाखेतील भिंतीवर उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र दिसल्याने संताप अनावर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शाखेत नेमके काय घडले?
सोमवारी रात्री खासदार श्रीकांत शिंदे चेंदणी कोळीवाड्यात एका क्रीडा कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांना आग्रहाने कोपरीतील शिवसेना शाखेत नेले. शाखेत प्रवेश करताच भिंतीवर एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्राशेजारी उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र पाहून ते नाराज झाल्याचे समजते. त्यानंतर त्यांनी शाखेतील पदाधिकारी आणि उपस्थित शिवसैनिकांना जाब विचारल्याची चर्चा आहे. या प्रसंगामुळे शाखेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि खासदार शिंदे तेथून तडक बाहेर पडल्याचेही सांगितले जाते. यावेळी उपस्थित असलेले खासदार नरेश म्हस्के यांनाही या नाराजीचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे.
साडेतीन वर्षांपासूनचा संघर्ष
शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यभरात शाखा आणि स्थानिक संघटनांवर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला. ठाण्यातील कोपरीदेखील त्याला अपवाद राहिले नाही. गेल्या साडेतीन वर्षांपासून या शाखेवरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू असल्याची पार्श्वभूमी आहे. अपेक्षित राजकीय ताकद उभी करता न आल्याने शिंदे गटाला या शाखेत उद्धव ठाकरे गटासोबत सहअस्तित्वाची तडजोड करावी लागल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जाते. परिणामी, एकाच शाखेत दोन्ही गटांचे नेते आणि कार्यकर्ते आपापली उपस्थिती दाखवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शाखेच्या भिंतीवर एका बाजूला उद्धव ठाकरे, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असल्याची परिस्थिती आहे.
मात्र, हा केवळ एका छायाचित्राचा विषय नसून गेल्या अनेक वर्षांपासून साचलेल्या स्थानिक राजकीय संघर्षाचे ते प्रतीक असल्याचे मानले जात आहे. या अंतर्गत धुसफुशीमागे केवळ शाखेचा वाद नसून कार्यकर्त्यांच्या मान-सन्मानाचाही प्रश्न असल्याचे बोलले जाते. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्याची खंत त्यामागे असल्याचे समजते.
प्रतिक्रिया व्यक्त करा