मधुमेह हा आज केवळ मोठ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. लहान मुलांमध्येही टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढताना दिसत आहे. दिवसभर एकाच जागी बसून काम करणं, तासनतास मोबाईल आणि संगणकाचा वापर, शारीरिक हालचालींचा अभाव, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अपुरी झोप यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शरीराकडून मिळणाऱ्या सुरुवातीच्या संकेतांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बदललेली जीवनशैली मधुमेहाच्या वाढत्या धोक्यामागील महत्त्वाचं कारण आहे. दिवसभर बैठं काम, जंक फूडचं अतिसेवन, अनियमित आहार, अपुरी झोप आणि सततचा मानसिक ताण यांचा आरोग्यावर परिणाम होतो. विशेषतः लहान मुलांमध्ये शारीरिक हालचाली कमी झाल्याने टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
मधुमेहाची चार प्रमुख लक्षणं ओळखा
मधुमेहाची सुरुवातीची लक्षणं ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः मुलांमध्ये टाइप-१ मधुमेहाची चार प्रमुख लक्षणं ४टी या नावाने ओळखली जातात. नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणं, विशेषतः रात्री वारंवार लघवी होणं; सतत पाणी प्यावंसं वाटणं आणि पाणी पिऊनही तहान न भागणं; पुरेशी विश्रांती घेऊनही अशक्तपणा आणि थकवा जाणवणं; आणि आहारात कोणताही बदल नसतानाही शरीराचं वजन वेगाने कमी होणं. ही लक्षणं दिसल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
धोका टाळण्यासाठी जीवनशैली बदला
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहानपणापासूनच आरोग्यदायी सवयी लावल्यास मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. यासाठी दररोज व्यायाम करणं, मैदानी खेळ खेळणं, संतुलित आहार घेणं आणि पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. मुलांचा मोबाईल आणि संगणकासमोरील वेळ मर्यादित ठेवण्याबरोबरच त्यांना शारीरिक हालचालींसाठी प्रोत्साहित करणंही महत्त्वाचं आहे.
मधुमेहाचं निदान होणं एवढंच पुरेसं नाही, तर मुलांना या आजाराचं योग्य व्यवस्थापन करता येणंही आवश्यक आहे. यामध्ये पालक आणि शाळेची भूमिका महत्त्वाची आहे. योग्य वैद्यकीय सल्ला, कुटुंबाचा पाठिंबा आणि नियमित उपचार यांच्या मदतीने मधुमेह असलेली मुलंही सक्रिय आणि निरोगी जीवन जगू शकतात. मधुमेहाची लक्षणं वेळीच ओळखणं, नियमित तपासणी करणं आणि जीवनशैलीत योग्य बदल करणं हेच या आजारापासून बचावासाठी महत्त्वाचं आहे. विशेषतः मुलांच्या आरोग्याकडे पालकांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
Leave a Reply