कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी एका वाक्यात मिश्किल उत्तर देत ही चर्चा फेटाळून लावली. गेली बारा वर्षं माझा शपथविधी होतोय, २०१४ पासून मी मंत्री होतेय, त्यामुळे या कोणत्याच कथांमध्ये मला घेऊ नका, असं त्या म्हणाल्या. गेल्या काही वर्षांपासून शरद पवार गटाच्या नेत्या केंद्रीय मंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. शरद पवार एनडीएमध्ये सामील होतील आणि सुप्रिया सुळे दिल्लीत मंत्री होतील, बाकीचे नेते राज्य सांभाळतील, अशी एक थिअरी अनेक वर्षांपासून मांडली जात आहे. त्यातच आता मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता.
संसदीय कामावर प्रश्न का नाहीत?
संसदेत बारामतीचं प्रतिनिधित्व करताना आपण महाराष्ट्राची प्रतिनिधी म्हणून जातो, असं सुळे म्हणाल्या. जेपीसीसह चार महत्त्वाच्या समित्यांवर त्या काम करत आहेत. मात्र या समित्यांबाबत कोणीच काही प्रश्न विचारत नाही, याचं त्यांना दुःख वाटतं. धोरणनिर्मितीबद्दल कोणी विचारत नाही, आपण ज्यासाठी निवडून गेलो त्याबद्दल विचारलं जात नाही, असं त्या म्हणाल्या. त्यावर एखादा प्रश्न विचारला तर आनंद होईल, असंही त्यांनी नमूद केलं.
विलिनीकरणावर मौन, गुप्त बैठकीची चर्चाही फेटाळली
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी हातच जोडले. मागच्या आठवड्यात या विषयावर आपण काय सांगितलं होतं, हे चॅनेलवर पाहता येईल, असं म्हणत त्यांनी रामकृष्ण हरी म्हणत अधिक भाष्य करणं टाळलं. रोहित पवार यांनी पक्षाची गुप्त बैठक घेतल्याच्या चर्चेकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर त्या हसून म्हणाल्या की गुप्त म्हणजे काय? रोहित नागपूरला नव्हता, लोकेशन तपासा. पक्षाची गुप्त बैठक हे इंटरेस्टिंग आहे, पहिल्यांदाच ऐकलं, असं विधान त्यांनी केलं.
दरम्यान, ही चर्चा एका इंग्रजी दैनिकातील वृत्तामुळे सुरू झाली होती. शरद पवार एनडीएसोबत जाण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकतात आणि त्यामुळे सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असं त्या वृत्तात म्हटलं होतं. एकनाथ शिंदे यांना भाजप मुख्यमंत्रीपद देऊ शकते, तर पवारही मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकतात, असा तर्क त्यात मांडण्यात आला होता.
Leave a Reply