राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी महत्त्वाची बैठक होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही बैठक बोलवली असून, ती मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे होणार आहे. राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या महिनाभरापासून पवारांचा पक्ष राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विलिनीकरण आणि एनडीएला पाठिंबा
दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण आणि एनडीएला पाठिंबा या प्रमुख मुद्यांवर पक्षाची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. विलिनीकरणाचा मुद्दा मागे पडल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्याचवेळी पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याचाही दावा करण्यात येत आहे. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर पक्षाची काय भूमिका असेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहित पवार उपस्थित राहणार?
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी मोर्चात सहभागी व्हायचे की नाही, यावरून पक्षात मतभेद असल्याची चर्चा आहे. रोहित पवार हे हिवाळी अधिवेशनावर ट्रॅक्टर मोर्चा नेणार असून, त्यासाठी शेगाव ते नागपूर असा शेतकरी मोर्चा काढणार आहेत. उद्याच्या बैठकीत याविषयी पक्ष काय भूमिका घेतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. रोहित पवार पक्षातील ज्येष्ठांना विचारात न घेता आंदोलने आणि दिशा ठरवत असल्याचा आरोप होत होता. तर आज शेतकरी मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो असल्याचे दिसून आले.
रोहित पवार हे नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी विदर्भातील काही पदाधिकाऱ्यांची गोपनीय बैठक नागपूरमध्ये घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पक्षातील वरिष्ठांची नाराजी कशी दूर करायची आणि ४ तारखेपासून निघणाऱ्या मोर्चावर उद्याच्या बैठकीत नेत्यांनी त्यांना कसे समजवायचे, याबाबत ही बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत विदर्भातील काही महत्त्वाचे आणि मोजकेच नेते उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज प्रतिक्रिया देताना गुप्त बैठक काय असते, असा खोचक सवाल विचारत अशा बैठकीचे दावे फेटाळले.
Leave a Reply