डिसेंबर महिना सुरू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. १ डिसेंबर २०२६ पासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे काही महत्त्वाचे आर्थिक बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये एसबीआय क्रेडिट कार्डचे नियम, एलपीजी सिलिंडरचे दर, आधार अपडेट, कमोडिटी ट्रेडिंग आणि बँकांच्या व्याजदरांचा समावेश आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच या बदलांची माहिती असणे आवश्यक आहे.
सात महत्त्वाचे बदल
१. एसबीआय क्रेडिट कार्डचे नियम: १ डिसेंबरपासून एसबीआय क्रेडिट कार्डच्या काही व्यवहारांवर जास्त शुल्क लागू होण्याची शक्यता आहे. एका व्यवहारात ३० हजार रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सपोर्ट पेमेंट केल्यास १ टक्के शुल्क आणि लागू कर आकारला जाऊ शकतो.
२. रिझर्व्ह बँकेची बैठक: रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची (एमपीसी) बैठक २ ते ४ डिसेंबरदरम्यान होणार आहे. या बैठकीत रेपो रेटबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. व्याजदर बदलल्यावर गृहकर्ज, कार लोन आणि एफडीच्या व्याजदरांवर परिणाम होऊ शकतो.
३. कमोडिटी ट्रेडिंगचे नवे नियम: सेबीकडून १ डिसेंबरपासून कमोडिटी डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगसाठी नवीन मार्जिन नियम लागू होण्याची माहिती आहे. त्यानुसार ट्रेडर्सना जोखमीच्या आधारावर ६, ८ किंवा १० टक्के प्रारंभिक मार्जिन ठेवावे लागू शकते.
४. आधार ईमेल अपडेट मोफत: आधार कार्डमध्ये ईमेल आयडी जोडण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आकारले जाणारे ७५ रुपयांचे शुल्क ३१ डिसेंबरपर्यंत माफ असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र ही सुविधा अधिकृत आधार मोबाइल अॅपमधूनच उपलब्ध असेल.
५. एनआरआयसाठी डिजिटल केवायसी: एनआरआय आणि ओसीआय कार्डधारकांना आता डिजिटल केवायसी करता येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांना केवायसी प्रक्रियेसाठी भारतात येण्याची गरज भासणार नाही.
६. एलपीजी सिलिंडरच्या किमती: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यामुळे १ डिसेंबरला घरगुती १४.२ किलो आणि व्यावसायिक १९ किलो सिलिंडरचे नवे दर जाहीर होऊ शकतात.
७. गृहकर्ज आणि एफडीवर परिणाम: रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट निर्णयानुसार बँका गृहकर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरांचा आढावा घेऊ शकतात. त्याचबरोबर एफडीवरील व्याजदरांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply