राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टोल भरणं टाळण्यासाठी काही वाहनचालक आपल्या गाडीची नंबर प्लेट लपवतात किंवा नंबर स्पष्ट दिसणार नाही अशी व्यवस्था करतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं आता कठोर पावलं उचलण्याची तयारी केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे.
चार ते आठ पट टोल आकारण्याचा प्रस्ताव
प्रस्तावित नियमानुसार, टोल भरणं टाळण्यासाठी वाहनाची नंबर प्लेट लपवली किंवा तिच्याशी छेडछाड केली, तर संबंधित वाहनचालकाकडून नियमित टोलच्या चार ते आठ पट रक्कम वसूल केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या टोल प्लाझावर सामान्य टोल १०० रुपये असेल, तर अशा नियमभंगासाठी ४०० ते ८०० रुपये भरावे लागू शकतात. तर १५० रुपये टोल असलेल्या ठिकाणी ही रक्कम ६०० ते १,२०० रुपयांपर्यंत जाऊ शकते.
कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची नजर
नंबर प्लेटवरील छेडछाड रोखण्यासाठी टोल प्लाझावर अत्याधुनिक कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा वापरण्याची तयारी सुरू केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं नंबर प्लेट लपवणाऱ्या किंवा तिच्यात बदल करणाऱ्या वाहनांची ओळख पटवली जाणार आहे. त्यामुळं टोल चुकवण्यासाठी नंबर प्लेटसोबत केलेली कोणतीही हुशारी सहज पकडली जाऊ शकते.
मोटार वाहन कायद्यानुसार नंबर प्लेटशी छेडछाड करणं हा नियमभंग आहे. यासाठी पहिल्या वेळी ५ हजार रुपये, तर पुन्हा नियमभंग केल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. हा दंड प्रस्तावित अतिरिक्त टोल आकारणीपेक्षा वेगळा असेल.
वाहनचालकांनी नंबर प्लेट नेहमी स्पष्ट आणि वाचता येण्यासारखी ठेवावी, त्यावर स्टिकर किंवा इतर वस्तू लावू नयेत, ती वाकवणं किंवा झाकणं टाळावं आणि प्लेट तुटली किंवा खराब झाली असल्यास तातडीनं बदलून घ्यावी. चार ते आठ पट टोल आकारण्याचा नियम सध्या केवळ प्रस्तावित असून त्याची अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळं प्रस्ताव आणि लागू झालेला नियम यातील फरक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
Leave a Reply