ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीसह असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी समाजमाध्यमावर एक भावूक संदेश लिहिला आहे. संपूर्ण वर्ष सरलं तरी मनातलं दु:ख तसंच असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. धर्मेंद्र हे केवळ आपले पती नव्हते, तर आपलं सर्वस्व होते, असं त्यांनी नमूद केलं आहे.
मित्र, मार्गदर्शक आणि आधारस्तंभ
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचं वर्णन मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक अशा शब्दांत केलं आहे. ते आपला आधारस्तंभ होते आणि थोडक्यात सांगायचं तर तेच आपलं संपूर्ण अस्तित्व होते, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्याशिवाय आयुष्य खूप रिकामं वाटत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यशाच्या शिखरावर पोहोचूनही ते जमिनीशी घट्ट जोडलेले राहिले आणि आपल्या मातीशी, मुळांशी असलेलं नातं त्यांनी कधीही तुटू दिलं नाही, असंही त्यांनी लिहिलं आहे.
पुनर्जन्माची आठवण आणि चाहत्यांचे आभार
भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणं आत्मा अमर असून त्याचा पुनर्जन्म होतो, याची आपल्याला जाणीव असल्याचं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे. मात्र या जन्मात, याच आयुष्यात आपल्याला त्यांची प्रेमळ सोबत आजही प्रकर्षानं आठवते, असंही त्यांनी नमूद केलं. धर्मेंद्र यांची आठवण काढणाऱ्या आणि त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करणाऱ्या लाखो चाहत्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत.
या संदेशासोबत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही खास आणि यापूर्वी सार्वजनिक न केलेले फोटोही शेअर केले आहेत. धर्मेंद्र यांनी सहा दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं. शोले, चुपके चुपके, फूल और पत्थर आणि सत्यकाम यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
Leave a Reply