माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे. राजीव गांधी यांची हत्या व्हावी या उद्देशानेच त्यांची सुरक्षा व्यवस्था जाणीवपूर्वक काढण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राच्या निमित्ताने सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी हा दावा केला.
सुरक्षा काढणे अपघात नव्हता, असा दावा
“पप्पांची सुरक्षा काढून घेतली गेली, जेणेकरून त्यांची हत्या व्हावी. ही सुरक्षा काढणे केवळ एखादा अपघात नव्हता, तर ते जाणीवपूर्वक केले गेले होते. त्यांची हत्या होण्यासाठीच तसे वातावरण तयार करण्यात आले होते,” असा दावा राहुल गांधी यांनी केला. त्या काळात जे काही घडत होते, ते स्पष्ट दिसत होते, असेही ते म्हणाले. या विषयावर आपण आईला सांगितले होते आणि घटनेपूर्वी वडिलांशी सुरक्षेच्या मुद्यावरून वादही झाला होता, याची आठवणही त्यांनी सांगितली.
राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावरही या संदर्भात एक पोस्ट केली आहे. “पप्पांची सुरक्षा मागे घेण्यामागे हेतू होता,” असे त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बिहार दौऱ्याच्या आठवणी
या संवादादरम्यान सोनिया गांधी यांनी बिहार दौऱ्याची त्यावेळची दाहकता सांगितली. राजीव गांधी त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. त्या दौऱ्यात राजीव गांधी उघड्या जीपमधून प्रवास करत होते. त्यांच्यावर दगडफेक झाली, तसेच घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली. हा दौरा अत्यंत भयावह होता, असे सोनिया गांधी म्हणाल्या. विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये नेत्यांच्या सुरक्षेबाबत उदासीनता दाखवली जाते, अशी चिंताही त्यावेळी व्यक्त केल्याची आठवण त्यांनी सांगितली.
सोनिया गांधी यांनी सांगितले की, या बिहार दौऱ्यात राहुल गांधी पूर्णवेळ आपल्या वडिलांसोबत होते. त्यांनी दगडफेक आणि विरोधकांचा तो हंगामा प्रत्यक्ष पाहिला. घरी परतल्यावर राहुल गांधी यांनी अत्यंत अस्वस्थ होऊन म्हटले की, “ममा, जर आपण पप्पांच्या सुरक्षेबाबत काही ठोस पाऊलं टाकली नाहीत, तर मला खात्री आहे की मला लवकरच त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी परत यावे लागेल.”
21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरंबदूर येथे झालेल्या एका आत्मघाती बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. श्रीलंकेतील तत्कालीन लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या फुटीरतावादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला होता.
Leave a Reply