करोना काळानंतर सिनेमे घरबसल्या पाहण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. चित्रपटगृहात जाण्याऐवजी स्वतःच्या सोयीनुसार वेळ मिळेल तसा सिनेमा पाहण्याला आजही अनेकजण पसंती देतात. त्यामुळे नवे सिनेमे ओटीटीवर कधी येणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष असते. आता मराठी चित्रपट पाच फुटाचा बच्चन ओटीटीवर दाखल झाला आहे. हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला असून घरबसल्या पाहता येणार आहे.
आपल्या वेगळ्या नावामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेल्या या चित्रपटाने चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंती मिळवली होती.
काय आहे सिनेमाची कथा?
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी केले आहे. भोंदू कीर्तनकारांची चर्चा सुरू असताना खरा कीर्तनकार कोण आणि कीर्तनपरंपरेचा मूळ गाभा काय, याचा विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. समता, सामाजिक जाणीव आणि संतविचारांचा संदेश देणारा हा सिनेमा मनोरंजनासोबत प्रेक्षकांना अंतर्मुखही करतो.
चित्रपटातील गाणी आणि संगीत हे त्याचे आणखी एक बलस्थान आहे. एका महिला कीर्तनकाराची व्यक्तिरेखा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असून श्रुती मधुदीप यांनी आपल्या अभिनयाने संपूर्ण चित्रपटाचा तोल सांभाळला आहे. किशोर कदम, चिन्मयी सुमीत, शशांक शेंडे, गौरी नलावडे, क्षितीश दाते यांसारखे परिचित चेहरे या चित्रपटात आहेत; त्यांच्यासोबत नवोदित कलाकारांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. समतेची वाट दाखवणारा आणि प्रेम व सहजीवनाचा अर्थ उलगडून सांगणारा हा चित्रपट कुटुंबासह पाहण्यासारखा आहे.
Leave a Reply