मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रॅपिडोविरोधात राज्यभर रिक्षा बंद; मुंबईत सेवा सुरू

रॅपिडो बाइक टॅक्सीमुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप करत संघटनांनी सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली. मात्र मुंबई-ठाण्यात रिक्षा सेवा सुरळीत होती.

रॅपिडोविरोधात राज्यभर रिक्षा बंद; मुंबईत सेवा सुरू

राज्यभरातील रिक्षा संघटनांनी सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली. रॅपिडोच्या सेवेमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा दावा करत हा बंद पुकारण्यात आला. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यभरातील रस्त्यांवर रिक्षा-टॅक्सी धावणार नाहीत, असा दावा संघटनांनी केला. या बंदला मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिकसह इतर जिल्ह्यांतून पाठिंबा मिळाला.

मुंबई आणि ठाण्यात सेवा सुरळीत

बंदची हाक असली तरी मुंबईच्या उपनगरांमध्ये त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने रिक्षा सुरू होत्या आणि प्रवासी नेहमीप्रमाणे रिक्षाने प्रवास करताना दिसले. ठाणे शहरातही रिक्षासेवा सुरळीत सुरू होती. रॅपिडोच्या दुचाकी प्रवासी वाहतुकीला विरोध करण्यासाठी राज्यातील संघटना एकवटल्या असून मनसेसह सर्वपक्षीय रिक्षा वाहतूक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या, वाहनांची नोंदणी, चालकांकडे असणारा बॅच आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

पुणे आणि कोल्हापुरात आंदोलनाचा परिणाम

पुण्यातील रिक्षा संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. मात्र शाळकरी विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी सकाळी रिक्षा वाहतूक सुरू ठेवण्यात आली आणि सकाळी १० नंतर रिक्षाचालक आंदोलनात सहभागी झाले. पुण्यात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयासमोर, तर पिंपरीत विधान परिषदेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापुरात हजारो रिक्षाचालक संपात सहभागी झाले असून शहरातील वाहतुकीवर परिणाम दिसून आला. बस स्थानक असो किंवा रेल्वे स्थानक, सर्व ठिकाणी नागरिक पायी चालत जाताना दिसले. सकाळी ११ वाजता सर्व रिक्षाचालक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येऊन आपल्या मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे सांगण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील रिक्षाचालक होते, मात्र आता रिक्षा व्यवसाय उध्वस्त व्हावा अशी सरकारची भूमिका असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance