राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी २०२२ मधील शिवसेनेच्या बंडाबाबत एका पॉडकास्टमध्ये केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बंडादरम्यान उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाणाऱ्या एका आमदाराचा जीव धोक्यात होता आणि आम्ही जर त्याला थांबवलं नसतं, तर त्या दिवशी त्याचं राम नाम सत्य झालं असतं, असा दावा शिरसाट यांनी केला आहे. या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
पॉडकास्टमध्ये शिरसाट नेमकं काय म्हणाले?
एका पॉडकास्टमध्ये बोलताना शिरसाट यांनी २०२२ मध्ये मुंबईहून सुरतला जाताना घडलेला एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले की, ही एखाद्या वेबसीरिजसारखी घटना आहे. बाहेर पाऊस पडत होता आणि एक आमदार परत जाण्यासाठी धडपडत होता. आम्ही जर त्या दिवशी थांबवलं नसतं, तर त्याचं राम नाम सत्य झालं असतं. आम्ही थांबवलं म्हणूनच त्याला सुखरूप परत जाता आलं, असे शिरसाट म्हणाले. मात्र नेमक्या कोणत्या आमदाराचा जीव धोक्यात होता आणि त्याला कोणापासून धोका होता, याचे नाव उघड करणे त्यांनी टाळले.
शिंदेंनी एकाच वाक्यात उत्तर दिले
शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर प्रसारमाध्यमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले. मात्र शिंदे यांनी या विषयावर फारसे भाष्य करणे टाळत एकाच वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली. संजय शिरसाट काय म्हणाले हे मला माहिती नाही, अशा मोजक्या शब्दांत शिंदे यांनी हा प्रश्न टाळला.
दरम्यान, शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर सुरतवरून परत आलेले ठाकरे गटाचे दोन आमदार, धाराशिवचे कैलास पाटील आणि अकोल्यातील बाळापूरचे नितीन देशमुख यांची नावे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. पाटील म्हणाले की, त्या बंडावेळी आम्ही दोघेच जण तिथून पळून परत आलो होतो. त्यामुळे नेमक्या कोणाच्या जीवाला धोका होता हे संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगावे आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. शिंदेंच्या शिवसेनेपासून आपल्या जीवाला धोका होता, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो आणि आता शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे तेच सिद्ध झाले आहे, असा दावा दोन्ही आमदारांनी केला आहे. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते या विधानानंतर चांगलेच आक्रमक झाले असून, या राम नाम सत्यमागील नेमके गुपित बाहेर येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply