नाशिक येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. १९ ते २३ नोव्हेंबर २०२६ दरम्यान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित झालेल्या २२ व्या ‘इंद्रधनुष्य’ महोत्सवात मुंबई विद्यापीठाने विक्रमी १२४ गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या महोत्सवाच्या २२ वर्षांच्या इतिहासात मुंबई विद्यापीठाचे हे २१ वे विजेतेपद ठरले आहे.
नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि एक कांस्य
संगीत, साहित्य, नृत्य आणि नाट्य या गटांतील स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. भारतीय शास्त्रीय गायन, पाश्चिमात्य समूह गायन, पाश्चिमात्य एकल गायन, भारतीय शास्त्रीय नृत्य, प्रहसन, भित्तिपत्र, मातीशिल्प आणि इंस्टॉलेशन या प्रकारांत संघाने नऊ सुवर्णपदके मिळवली. भारतीय समूह गायन, पाश्चिमात्य वाद्यवादन, भारतीय शास्त्रीय तालवाद्य, लोकवाद्यवृंद, भारतीय लोकनृत्य, मुकनाट्य, एकांकिका आणि रांगोळी या स्पर्धांमध्ये आठ रौप्यपदके मिळाली, तर वक्तृत्व स्पर्धेत एक कांस्यपदक मिळाले. राज्यातील २३ विद्यापीठे या महोत्सवात सहभागी झाली होती.
गोल्डन गर्ल आणि गोल्डन बॉय पुरस्कार
अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्तम कामगिरी केल्याबद्दल कुमारी लक्ष्मी एस. यांना ‘गोल्डन गर्ल’ पुरस्काराने, तर आर्य गोडबोले, प्रथमेश म्हात्रे आणि हर्ष परिहार यांना ‘गोल्डन बॉय’ पुरस्काराने गौरवण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या ५५ विद्यार्थ्यांच्या संघाने या सर्व कलाप्रकारांत सहभाग घेतला होता. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी विजेत्या चमूचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे नियोजन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांनी यशस्वीपणे केले होते.
Leave a Reply