आजच्या युगात ज्याच्याकडे प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शक्तिशाली सेमीकंडक्टर चिप्स आहेत, तोच देश जगावर वर्चस्व गाजवणार, हे आता स्पष्ट झालं आहे. याच वर्चस्वासाठी अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अघोषित ‘चिप युद्ध’ सुरू आहे. या संघर्षात आता एक खळबळजनक वळण आलं आहे. अमेरिकन टेक कंपनी ‘एनव्हिडिया’च्या अत्याधुनिक एआय चिप्स मिळवण्यासाठी चीनच्या गुप्तचर संस्थेने थेट हेरगिरीचा मार्ग अवलंबल्याचा मोठा खुलासा झाला आहे.
प्रकरण समोर येण्याच्या दोन वर्षे आधीच सुरू झाली होती मोहीम
समोर आलेल्या माहितीनुसार, एनव्हिडिया हेरगिरी प्रकरण जगासमोर येण्याच्या तब्बल दोन वर्षे आधीच चीनने आपली गुप्त मोहीम सुरू केली होती. चीनच्या ‘राज्य सुरक्षा मंत्रालयाने’ केवळ अमेरिकेचे निर्यात निर्बंध तोडून अत्याधुनिक एआय चिप्स चीनमध्ये आणण्याचा प्रयत्न केला नाही, तर जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाची संवेदनशील आणि गुप्त माहिती गोळा करण्याचं मोठं जाळंही विणलं होतं, असं सांगितलं जात आहे.
शी जिनपिंग यांचं ‘तांत्रिक आत्मनिर्भरतेचं’ धोरण
ही हेरगिरी मोहीम चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या व्यापक ‘तांत्रिक आत्मनिर्भरता’ धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं मानलं जात आहे. पाश्चात्त्य देशांच्या तांत्रिक मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी चीनने आपली संपूर्ण शासकीय आणि गुप्तचर यंत्रणा कामाला लावली आहे. या धोरणाचा समन्वय साधण्यासाठी २०२३ मध्ये चीनने ‘केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग’ स्थापन केला. जानेवारी महिन्यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी महत्त्वाच्या तांत्रिक क्षेत्रांमधील अडथळे दूर करण्यासाठी ‘असाधारण उपाययोजना’ करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात चीनचे राज्य सुरक्षा मंत्री चेन यिक्सिन यांनीही पाश्चात्त्य देशांची तांत्रिक नाकेबंदी मोडून काढण्याची आणि एआय क्षेत्रातील नवोपक्रमाला वेग देण्याची गरज अधोरेखित केली होती.
अमेरिकेचे निर्बंध आणि सिंगापूर कनेक्शन
२०२२ च्या अखेरीस अमेरिकेने एनव्हिडियाच्या प्रगत एआय चिप्सच्या चीनमधील निर्यातीवर कडक निर्बंध लादले. चीन या चिप्सचा वापर आपली लष्करी क्षमता वाढवण्यासाठी, आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्यासाठी आणि गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी करू शकतो, अशी अमेरिकेला भीती होती. थेट मार्ग बंद झाल्यामुळे चीनने तिसऱ्या देशातील कंपन्यांच्या माध्यमातून चिप्स खरेदी करून त्या गुपचूप चीनमध्ये पोहोचवण्याची रणनीती आखली, असं सांगितलं जात आहे. या प्रकरणाच्या तपासात सिंगापूरस्थित ‘मेगास्पीड’ नावाच्या डेटा सेंटर कंपनीचं नाव समोर आलं आहे. या कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी डॉलर्सच्या एनव्हिडिया एआय चिप्स खरेदी केल्या गेल्या आणि त्यातील मोठा साठा अप्रत्यक्षपणे चिनी कंपन्यांना व डेटा सेंटर्सना पुरवला गेला, असा संशय अमेरिकन तपास यंत्रणांना आहे. मेगास्पीडच्या माजी भागीदार व कार्यकारी अधिकारी ॲलिस हुआंग यांच्या कुटुंबाशी आणि व्यावसायिक भागीदारांशी संबंधित काही कंपन्यांचे धागेदोरे चीनच्या संरक्षण उद्योगाशी जोडलेले असल्याचंही तपासात समोर आलं आहे. दुसरीकडे, चीनने हेरगिरीचे आणि चिप्स तस्करीचे सर्व आरोप पूर्णपणे खोटे व निराधार असल्याचं सांगून फेटाळून लावले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, चीनची तांत्रिक प्रगती ही स्वतःच्या संशोधनावर आणि खुल्या सहकार्यावर आधारित आहे.
Leave a Reply