भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) बिस्लेरी कंपनीवर खटला चालवण्यास मंजुरी दिल्यानंतर कंपनीने यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण सुमारे १४ महिने जुने असून, ते सप्टेंबर २०२५ मध्ये गोवा येथील उत्पादन युनिटमध्ये तयार झालेल्या एका बॅचशी संबंधित आहे. हे युनिट कंपनीच्या देशभरातील १४३ प्लांटपैकी एक आहे.
एफएसएसएआयने बिस्लेरीच्या पाण्याच्या दोन चाचण्या अयशस्वी ठरल्याचे म्हटले आहे. पहिल्या चाचणीत ब्रोमेटची पातळी निश्चित मर्यादेपेक्षा जास्त, म्हणजेच प्रति लिटर १२ मायक्रोग्रॅम असल्याचे आढळले, तर विहित मर्यादा प्रति लिटर १० मायक्रोग्रॅम आहे. दुसऱ्या चाचणीत ब्रोमेट आणि पीएएचएस हे दोन्ही घटक आढळले. कंपनीच्या अपीलानंतर नमुना एका संदर्भ प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. तेथे ब्रोमेट अनुज्ञेय मर्यादेत असल्याचे आढळले, परंतु पीएएचएसच्या उपस्थितीमुळे नमुना पुन्हा असुरक्षित ठरवण्यात आला.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
३० सप्टेंबर २०२५ रोजी एफएसएसएआयने गोवा युनिटमधून सहा नमुने गोळा केले होते. प्राथमिक चाचणीत पाच नमुने सर्व विहित मानकांची पूर्तता करत असल्याचे आढळले. सहाव्या नमुन्यात ब्रोमेटची पातळी प्रति लिटर १२ मायक्रोग्रॅम होती. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी बिस्लेरीने केलेल्या अपीलानंतर एफएसएसएआयने तो नमुना पुनर्तपासणीसाठी संदर्भ प्रयोगशाळेत पाठवला.
संदर्भ प्रयोगशाळेच्या चाचणीत ब्रोमेटची पातळी विहित मर्यादेत आढळली, परंतु नमुन्यात पॉलीॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (पीएएचएस) ची उपस्थितीही नोंदवली गेली. ही तफावत लक्षात घेऊन बिस्लेरीने एफएसएसएआय-मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत त्याच नमुन्याची स्वतंत्र चाचणी करवून घेतली. या चाचणीतही ब्रोमेटची पातळी विहित मर्यादेत असल्याचे आढळले.
कंपनीचे म्हणणे काय?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या औपचारिक पत्रासह स्वतंत्र चाचणीचे निकाल एफएसएसएआयच्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाला सादर करण्यात आले आहेत. तेव्हापासून एफएसएसएआयकडून कोणतीही पुढील माहिती मिळालेली नाही, त्यामुळे हे प्रकरण बंद झाले आहे असे कंपनीने गृहीत धरले होते.
आजपर्यंत बिस्लेरीला ईमेलद्वारे किंवा छापील स्वरूपात कोणतीही सूचना मिळालेली नाही, तसेच एफएसएसएआयच्या वेबसाइटवरही अशी कोणतीही सूचना दिसलेली नाही, असे कंपनीने म्हटले आहे. एफएसएसएआयने अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत कंपनीवर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही विशिष्ट बॅचवर देशव्यापी रिकॉल किंवा बंदी जाहीर करण्यात आलेली नाही.
पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता हे बिस्लेरीसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनी १० टप्प्यांच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान ९० हून अधिक कठोर गुणवत्ता चाचण्या करते. योग्य नियामक प्रक्रियेद्वारे हे प्रकरण सोडवण्यासाठी एफएसएसएआयसोबत सहकार्य करत राहू, असेही कंपनीने म्हटले आहे. बिस्लेरी अनेक वर्षांपासून एक विश्वासार्ह ब्रँड असून, पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
Leave a Reply