छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांमध्ये सोमवारपासून पुन्हा विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू झाली. दिवाळीच्या तब्बल वीस दिवसांच्या सुट्टीनंतर जिल्हा परिषदेच्या आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून नियमित वेळापत्रकानुसार भरू लागले आहेत. तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शाळांचे आवार पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजले असून, दुसऱ्या सत्रातील शैक्षणिक कामकाजाला वेग येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिलेल्या नियोजनानुसार शाळांना २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू झाली होती. सुरुवातीला १९ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी देण्याचे ठरले होते. मात्र, शिक्षण समितीच्या निर्णयानंतर ही सुट्टी २१ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे २ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत शाळांना एकूण २० दिवस सुट्टी मिळाली. रविवारची सुट्टी संपताच सोमवारपासून शाळा नेहमीच्या वेळेत सुरू झाल्या.
डिसेंबरमध्ये मूल्यमापन चाचणी
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) घेतली जाणारी संकलित मूल्यमापन चाचणी आता डिसेंबरमध्ये होणार आहे. यापूर्वी ही चाचणी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे नियोजन होते. मात्र, सुधारित वेळापत्रकानुसार २, ३ आणि ५ डिसेंबर रोजी ही चाचणी घेतली जाणार आहे.
२ डिसेंबरला प्रथम भाषा, ३ डिसेंबरला गणित, तर ५ डिसेंबरला तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी विषयाची परीक्षा होईल. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती, विषयज्ञान आणि मूलभूत शैक्षणिक क्षमतांची पडताळणी केली जाणार आहे.
मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन
चाचणीतील गुणांच्या आधारे अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आणि उपचारात्मक अध्यापन राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू होताच शिक्षकांना नियमित अध्यापनासोबतच चाचणीची तयारीही करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत शाळांमधील शैक्षणिक उपक्रमांना वेग येईल, तर विद्यार्थ्यांसमोरही अभ्यास आणि मूल्यमापनाचे आव्हान असणार आहे.
Leave a Reply