उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे अधिकृत फेसबुक पेज सोमवारी पुन्हा एकदा सस्पेंड करण्यात आले आहे. यापूर्वी गेल्या वर्षी १० ऑक्टोबरला देखील त्यांचे अधिकृत फेसबुक अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. मात्र काही वेळातच त्यांचे फेसबुक अकाउंट पुन्हा पूर्ववत करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज सस्पेंड झाले आहे.
तांत्रिक कारण की मेटाची कारवाई?
काही तांत्रिक कारणामुळे ही समस्या निर्माण झाली आहे की, फेसबुकची पॅरंट कंपनी असलेल्या मेटाने दंडात्मक कारवाई केली आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. जे फेसबुक पेज सस्पेंड करण्यात आले आहे, ते अखिलेश यादव यांच्या नावाने असलेले अधिकृत फेसबुक पेज आहे. या फेसबुक पेजचे तब्बल ९० लाख फॉलोअर्स आहेत.
या संदर्भात अद्याप मेटाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. काही नेत्यांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार, काही तांत्रिक कारणांमुळे हे फेसबुक पेज सस्पेंड झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याचदरम्यान याबद्दल माहिती देणारे एक ट्विट समाजवादी पार्टीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून करण्यात आले आहे. माननीय राष्ट्रीय अध्यक्षांचे फेसबुक पेज अस्थाई स्वरुपात काम करत नसल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
समाजवादी पार्टीची प्रतिक्रिया
अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर पक्षाकडून ट्विट करत याबद्दल माहिती देण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज सध्या काम करत नाही, मेटा या समस्येवर काम करत आहे, अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. गेल्या वर्षी १० ऑक्टोबरला अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट सस्पेंड झाले होते. त्यावेळी काही समाजवादी पार्टीच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर आरोप करण्यात आले होते. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप सरकारच्या इशाऱ्यावरून हे फेसबुक अकाउंट बंद केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.
Leave a Reply