सुंदर दिसणे म्हणजे गोरे असणे, हा समाजातील गैरसमज अनेकदा जीवावर बेतू शकतो, याचे धक्कादायक उदाहरण केरळच्या मलप्पुरममधून समोर आले आहे. येथे एका १७ वर्षीय मुलीने इन्स्टाग्रामवर जाहिरात पाहून मागवलेली फेअरनेस क्रीम वापरल्याने तिची किडनी निकामी होण्यापर्यंत प्रकृती खालावली आहे.
मुलीने इन्स्टाग्रामवर काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सचे प्रमोशन व्हिडिओ पाहिले होते. या क्रीममुळे चेहऱ्यावरील मुरुम, काळे डाग आणि वांग निघून जातात, असा दावा त्या व्हिडिओमध्ये करण्यात आला होता. जाहिरातीला भुलून मुलीने इन्स्टाग्रामवर दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून विक्रेत्याशी संपर्क साधला आणि क्रीम मागवली. सुरुवातीला चेहऱ्यावर फरक दिसल्याने तिने एका वर्षात अशा अनेक बाटल्या मागवून वापरल्या.
बीपी कमी, पाय सुजले; किडनीचा गंभीर आजार
क्रीमच्या सततच्या वापरामुळे काही दिवसांतच मुलीची प्रकृती वेगाने बिघडू लागली. तिचे ब्लड प्रेशर अचानक कमी होऊ लागले आणि तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडू लागली. पायांवर मोठी सूज आल्याने चालणेही कठीण झाले. प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुलीवर उपचार करणाऱ्या नेफ्रोलॉजिस्ट डॉ. गौरी एस. यांनी सांगितले की, वैद्यकीय चाचण्यांमध्ये तिच्या रक्तात आणि शरीरात पाऱ्याची पातळी अत्यंत धोकादायक स्तरावर वाढलेली आढळली. तपासात तिला मेम्ब्रेनस नेफ्रोपैथी नावाचा किडनीचा गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाले. हे रुग्णालय मलप्पुरम येथील एस्टर मिम्स मदर हॉस्पिटल आहे.
क्रीममध्ये १२,५०० पीपीएम पारा
शरीरातील पारा किडनीच्या गाळण्याच्या प्रक्रियेला मोठे नुकसान पोहोचवतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. संबंधित फेअरनेस क्रीमची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असता त्यात तब्बल १२,५०० पार्ट्स पर मिलियन पारा आढळून आला, तर सामान्यपणे ही सुरक्षित मर्यादा १ पीपीएमपेक्षाही कमी असते.
पीडित मुलीने प्रकृती बिघडल्याची माहिती संबंधित कंपनीला दिली असता, सुरुवातीला त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्याचे सांगितले आणि नंतर मेसेजला उत्तर देणेच बंद केले. आता मुलीच्या कुटुंबीयांनी कंपनीविरुद्ध ग्राहक न्यायालयात कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला असल्याने सध्या क्रीमचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत केरळ राज्य बालक हक्क संरक्षण आयोगाने स्वतःहून कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. आयोगाने आरोग्य सेवा संचालक, राज्य पोलीसप्रमुख, औषध नियंत्रक, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण आणि रुग्णालयाच्या अधीक्षकांकडे तातडीने अहवाल मागवला असून पुढील कारवाई सुरू केली आहे.
Leave a Reply