नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अलोकनाथ वर्मा नाशिकमध्ये आले होते. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कुंभमेळ्याबाबत एक मोठी मागणी मांडली. कुंभमेळ्यात मुस्लिमांना प्रवेश दिला जाऊ नये, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
हिंदू मंदिरे आणि आश्रम ही पर्यटन स्थळे नसून ती श्रद्धेची ठिकाणे आहेत, असे वर्मा म्हणाले. मक्का येथे फक्त मुस्लिमांनाच प्रवेश असल्याचे फलक लावले जातात, त्यामुळे आपल्या धार्मिक स्थळांवर त्यांनी येणे योग्य नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.
कुंभमेळ्याच्या तयारीबाबत सूचना
कुंभमेळ्याचा आढावा घेतल्याचे सांगताना वर्मा म्हणाले की, साधू-महंतांकडून रस्त्यांची कामे सुरू आहेत, मात्र काही कामे सावधगिरीने होणे गरजेचे आहे. कुंभमेळ्याला आता फक्त आठ महिने शिल्लक असल्याने कामे लवकर पूर्ण व्हायला हवीत, असे त्यांचे म्हणणे होते. काही ठिकाणी तर सर्वेक्षणही झालेले नाही आणि पैसेही मिळालेले नाहीत, असे त्यांनी नमूद केले.
सरकारी जागेवर असलेले आश्रम तोडले जाऊ नयेत, अशीही त्यांची मागणी आहे. चक्रतीर्थाचा पूर्ण विकास व्हावा, मास-मच्छी बाजार हटवला जावा आणि दारूची दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर मुद्द्यांवरही भाष्य
चक्रतीर्थावर गेल्यावर प्रसन्न वाटल्याचे वर्मा यांनी सांगितले. धर्मध्वज कार्यक्रम जनजाती समाजाला अर्पण केल्यासारखा असल्याचे त्यांनी नमूद केले. जनजाती किंवा इतरांना वंचित ठेवले जाते, असा आरोप केला जात होता, त्याला आता उत्तर मिळाल्याचे ते म्हणाले.
अशोक सिंगल यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने एक कोटी हितचिंतक बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारने समान नागरिक कायद्याकडे एक पाऊल टाकले असून उत्तराखंड, गुजरात आणि आसाम पुढे गेल्याचे त्यांनी सांगितले. महिला-पुरुष समानता असली पाहिजे आणि संपूर्ण विश्व एक पती-एक पत्नी या सूत्रावर चालते, असे त्यांचे म्हणणे होते. तीन महिन्यांत तीन वेळा तलाक दिल्यास महिला रस्त्यावर येते, तसेच पतीच्या मृत्यूनंतर त्याचा हिस्सा पत्नीला मिळायलाच पाहिजे, त्यासाठी कायदा आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लालच दाखवून धर्मांतर होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Leave a Reply