थंडीच्या दिवसांत शरीर थोडे आळशी होते. पांघरुणातून बाहेर पडणे अवघड वाटते आणि त्याचा परिणाम खाण्याच्या सवयींवर होतो. सकाळच्या नाश्त्यात होणाऱ्या चुकांची पुनरावृत्ती झाली, तर दिवसभर थकवा जाणवतो. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात शरीराला पोषक घटकांतून ऊर्जेची गरज असते, त्यामुळे आरोग्यदायी आहार घेणे महत्त्वाचे ठरते. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि हार्मोन्समधील बदल यांचाही थकव्याशी संबंध असतो.
नाश्ता टाळणे आणि फक्त चहा-कॉफी पिणे
थंडीत अनेकजण सकाळची कामे पुढे ढकलतात आणि त्यात नाश्ता न करणे किंवा उशिरा करणेही येते. नाश्ता न करणाऱ्यांना जास्त भूक लागते, थकवा जाणवतो आणि शरीराच्या कामकाजावर परिणाम होतो, विशेषतः आदल्या रात्री लवकर जेवण केले असेल तर. नाश्त्यातून कर्बोदके, प्रथिने आणि फायबर मिळतात, ज्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते. काहीजण नाश्त्याऐवजी फक्त चहा किंवा कॉफी पितात. कॅफीनमुळे क्षणिक ऊर्जा मिळते, पण त्यावरच अवलंबून राहिल्याने भूक वाढते आणि हळूहळू ऊर्जा कमी होते. कॅफीनचे अतिसेवन झोपेच्या चक्रात व्यत्यय आणते आणि दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो.
शुद्ध कर्बोदके, प्रथिनांचा अभाव आणि कमी पाणी
बिस्किटे, पांढरा ब्रेड आणि गोड तृणधान्ये यांसारखे पदार्थ अनेकांच्या सकाळच्या नाश्त्याचा मुख्य भाग असतात. हे पदार्थ शुद्ध केलेल्या कर्बोदकांपासून बनतात, त्यांत फायबर किंवा प्रथिने नसतात आणि ते पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. त्याऐवजी हिवाळ्यात भाज्यांसोबत पोहे, ओट्स, अख्ख्या धान्याचा डोसा किंवा अख्ख्या धान्याचा टोस्ट खावा. केवळ कर्बोदकांवर अवलंबून राहणे हीही चूक आहे. प्रथिने स्नायू निरोगी ठेवतात आणि पोट भरलेले राहण्यास मदत करतात. अंडी, संपूर्ण धान्य, कडधान्ये, मोड आलेले धान्य, सुका मेवा आणि दही यांतून हिवाळ्यात प्रथिनांची गरज पूर्ण होऊ शकते. पाणी कमी पिणे ही हिवाळ्यातील सर्वांत मोठी चूक मानली जाते. अनेकजण फक्त तहान लागल्यावरच पाणी पितात, पण यामुळे दिवसभर थकवा, थंडीमुळे अंगदुखी आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. तज्ज्ञ दररोज किमान २.५ लिटर पाणी पिण्याची शिफारस करतात.
Leave a Reply