मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

शेंगदाणा श्वसननलिकेत अडकला; डॉक्टरांनी बाळाचे प्राण वाचवले

जसलोक रुग्णालयातील डॉक्टरांनी २३ महिन्यांच्या बाळाच्या श्वसननलिकेत अडकलेला शेंगदाणा शस्त्रक्रिया न करता बाहेर काढला. प्रगत ब्रॉन्कोस्कोपीने बाळाचे प्राण वाचवले.

शेंगदाणा श्वसननलिकेत अडकला; डॉक्टरांनी बाळाचे प्राण वाचवले

मुंबईतील एका खासगी रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत नाजूक वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. २३ महिन्यांच्या बाळाच्या डाव्या मुख्य श्वसननलिकेत अडकलेला शेंगदाणा कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. त्यासाठी प्रगत फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपी आणि क्रायो-तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

दोन दिवसांपासून खोकला, श्वास घेण्यास त्रास

पृथ्वीक असे या बाळाचे नाव आहे. त्याला दोन दिवसांपासून तीव्र खोकला, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि उलट्या होत होत्या. त्यामुळे त्याला मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. शेंगदाणे खाताना त्याला ठसका लागला होता. प्रथमोपचारांमुळे अर्धा शेंगदाणा बाहेर पडला. मात्र उरलेला तुकडा श्वसननलिकेत खोलवर जाऊन अडकला होता. छातीच्या एचआरसीटी तपासणीत डाव्या मुख्य श्वसननलिकेचा मार्ग जवळपास पूर्णपणे बंद झाल्याचे आढळले. त्याचे डावे फुफ्फुस हवा भरून फुगले असून त्याला सूज आल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले.

गोठवून शेंगदाणा बाहेर काढला

बाळाचे वय अतिशय लहान असल्याने रक्तस्रावाचा धोका होता. मऊ झालेला शेंगदाणा तुटून फुफ्फुसात अधिक खोलवर जाण्याची भीतीही होती. त्यामुळे डॉक्टरांनी आधी व्हर्च्युअल ब्रॉन्कोस्कोपीद्वारे शेंगदाण्याचे स्थान निश्चित केले. त्यानंतर चार मिमी फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोप आणि १.१ मिमी क्रायोप्रोबच्या साहाय्याने ०.४ बाय ०.७ सेंमी आकाराचा शेंगदाणा गोठवून घट्ट पकडण्यात आला. त्यानंतर तो अलगद बाहेर काढण्यात आला. श्वसननलिकेतील सूज कमी करण्यासाठी क्रायो-डीबल्किंग प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर पृथ्वीकची प्रकृती स्थिर असून त्यात वेगाने सुधारणा होत आहे.

या वैद्यकीय पथकात सल्लागार इंटरव्हेंशनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. कुशल चिडगुपकर, बालरोग विभागाचे संचालक डॉ. फजल नबी आणि भूलतज्ज्ञ डॉ. चित्रा व डॉ. मोहित यांचा समावेश होता. लहान मुलांच्या श्वसननलिकेत अन्नकण अडकणे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे गंभीर संसर्ग होऊ शकतो, असे डॉ. चिडगुपकर यांनी सांगितले. क्रायोप्रोबसह फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपचा वापर केल्याने शेंगदाणा गोठवून बाहेर काढता आला आणि श्वसननलिकेतील सूजही कमी करता आली. लहान मुलांसाठी ही कमीतकमी छेदनाची पद्धत अत्यंत सुरक्षित मानली जाते, असेही ते म्हणाले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance