देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने न्यायिक अधिकाऱ्यांमधील शिस्तीच्या अभावाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायिक अधिकाऱ्यांच्या मागण्या सध्या खूप वाढल्या आहेत, असे मत खंडपीठाने सुनावणीदरम्यान नोंदवले.
चेंबरमध्ये कॉफी पित बसतात, असा आरोप
सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी म्हटले की, कर्तव्याच्या वेळेत अनेक अधिकारी आपल्या चेंबरमध्ये बसून कॉफी पित असतात. सकाळी दहा वाजता न्यायालयात गेलो तरी ते आपल्या जागेवर दिसत नाहीत, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या डोक्यात चोवीस तास आपल्याला कोणत्या सोयीसुविधा मिळणार, हाच विचार सुरू असतो, असेही ते म्हणाले.
सुविधा आणि निवृत्तीच्या लाभांवर नाराजी
सेवेदरम्यान मिळणाऱ्या सुविधा आणि सेवानिवृत्तीनंतरचे लाभ यांसाठी न्यायिक अधिकारी वारंवार न्यायालयात दाद मागतात, यावरही खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. सेवा, निवृत्तीचे वय, सुविधा आणि भत्ते यांसंदर्भात वारंवार आवाज उठवला जात असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले.
केरळ उच्च न्यायालयाशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी ही टिप्पणी करण्यात आली. या खंडपीठात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासह न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश होता. न्यायव्यवस्थेत शिस्तीची गरज असल्याचे खंडपीठाने या वेळी अधोरेखित केले. तुम्ही दिवसभर किती काम करता, हे आम्हाला माहिती आहे, असेही सरन्यायाधीशांनी सुनावणीत म्हटले.
Leave a Reply