नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सांस्कृतिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्यावर मुख्य कुंभमेळा गीतासह इतर गाण्यांच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी निविदा प्रक्रिया न राबवता त्यांची थेट निवड करण्यात आली आहे.
एक कोटी रुपये आणि जीएसटी खर्चाला मंजुरी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने भक्ती आणि संस्कृतीचा वारसा संगीताच्या माध्यमातून जगभर पोहोचवण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. यासाठी अजय-अतुल यांच्यावर कुंभमेळा गाण्याच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खास म्हणजे, या कामासाठी निविदा मागवण्याऐवजी प्राधिकरणाने थेट या संगीतकार जोडीची निवड केली आहे.
कुंभमेळा गाण्याच्या निर्मितीसाठी अजय-अतुल यांनी राज्य सरकारकडे स्वतःचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये मूळ संगीत तयार करणे, स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करणे आणि मिक्सिंग करणे अशा कामांचा समावेश होता. या प्रस्तावानंतर नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने त्यांच्याकडे गाणे बनवण्याचे काम सोपवण्याचा निर्णय घेतला.
या जबाबदारीचे स्वरूप फक्त एका गाण्यापुरते मर्यादित नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य कुंभमेळा गाण्यासोबतच दुसरी गाणी पण अजय-अतुल तयार करणार आहेत. या पूर्ण कामासाठी एक कोटी रुपये आणि त्यावर वस्तू व सेवा कर (जीएसटी) अशी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
निवडीमागचे कारण काय?
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू असून, रस्ते-पाणी सारख्या कामांसोबतच या सोहळ्याची सांस्कृतिक ओळख बनवण्यावर पण सरकारचा भर आहे. कुंभपर्वाच्या सुरुवातीला झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात याची झलक बघायला मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले कुंभमेळा गाणे सादर करण्यात आले.
‘भाग्य जन्माचे सोयरे झाले, कुंभनगरीत मला घेऊन आले’ असे या गाण्याचे बोल आहेत. गोदावरी नदीचे महत्त्व आणि कुंभपर्वाचे धार्मिक महत्त्व गाण्यातून मांडण्यात आले. या गाण्याला सध्या चांगली लोकप्रियता मिळत असून, त्याचे बोल अनेकांच्या लक्षात राहिले आहेत.
अजय-अतुल यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची ओळख निर्माण केली आहे. त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान, संगीतकौशल्य तसेच महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरांची असलेली जाण या गोष्टींचा विचार करून त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. याआधी अनेक नामवंत कलाकार होऊन गेले असले, तरी सध्याच्या काळात अजय-अतुल यांचे नाव संगीत क्षेत्रात खास चर्चेत असल्याचे पण निवडीमागच्या कारणांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
अजय-अतुल यांच्या निवडीबाबत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, अजय-अतुल यांचे संगीत कौशल्य, राज्याची संस्कृती आणि परंपरा यांची त्यांना असलेली जाण तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी महाराष्ट्राचा वाढवलेला नावलौकिक लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली. निविदा प्रक्रिया राबवली असती, तर त्यांनी त्यात भाग घेतला नसता. त्यामुळे कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम आणि आम्ही निविदा प्रक्रिया न राबवता त्यांची निवड केली, असे शेखर सिंह यांनी सांगितले.
Leave a Reply