हिवाळ्यात थंडी आणि कमी उन्हामुळे कपडे वाळवणे अनेकांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. उन्हाळ्यात काही तासांत वाळणारे कपडे थंडीत मात्र दिवसभर ओले राहतात. सकाळी धुतलेले कपडे संध्याकाळपर्यंत ओलसर राहिल्यामुळे त्यांना कुबट वासही येऊ शकतो. अशावेळी काही सोप्या घरगुती उपायांनी थंडीतही कपडे लवकर वाळवता येतात.
कपडे लवकर वाळवण्यासाठी ८ सोपे उपाय
१. स्पिन सायकलचा वापर: कपडे धुतल्यानंतर त्यातील जास्तीचे पाणी काढणे महत्त्वाचे असते. वॉशिंग मशीनमधील स्पिन सायकल वापरल्यास कपड्यांमधील अतिरिक्त पाणी बाहेर पडते आणि कपडे लवकर सुकतात.
२. कपड्यांमध्ये अंतर ठेवा: जागा कमी असल्यामुळे आपण अनेकदा कपडे एकमेकांना चिकटून वाळत घालतो. मात्र त्यामुळे कपड्यांमधील ओलावा लवकर निघत नाही. प्रत्येक कपड्यामध्ये थोडे अंतर ठेवल्यास हवा सर्व बाजूंनी खेळती राहते आणि कपडे लवकर सुकतात.
३. पंख्याचा वापर करा: बाहेर ऊन नसेल तर घरातील पंखा सुरू ठेवा. कपड्यांवर थेट गरम हवा देण्याऐवजी खोलीतील हवा खेळती राहील याची काळजी घ्या. खिडकी थोडी उघडी ठेवल्यास दमट हवा बाहेर जाण्यासही मदत होते.
४. टॉवेलने पाणी काढा: लहान किंवा नाजूक कपडे लवकर वाळवायचे असतील तर स्वच्छ, कोरडा टॉवेल वापरा. कपडा टॉवेलवर पसरवून हलक्या हाताने दाबा. टॉवेल अतिरिक्त ओलावा शोषून घेईल. मात्र कपडा जोरात पिळू नका, त्यामुळे त्याचा आकार खराब होऊ शकतो.
५. सकाळच्या उन्हात वाळत घाला: सूर्यप्रकाश मिळताच कपडे बाहेर वाळत घाला. शक्य असल्यास कपडे अशा जागी ठेवा जिथे थेट सूर्यप्रकाश आणि हवा दोन्ही मिळतील. संध्याकाळी दव पडण्यापूर्वी कपडे घरात आणा.
६. जाड-पातळ कपडे वेगवेगळे वाळवा: स्वेटर, जीन्स, टॉवेल आणि जाड चादरी वाळण्यास जास्त वेळ लागतो. टी-शर्ट, रुमाल आणि हलके कपडे तुलनेने लवकर सुकतात. त्यामुळे जाड आणि पातळ कपडे वेगवेगळे वाळत घाला आणि जाड कपड्यांना अधिक जागा द्या.
७. हँगरवर वाळत घाला: शर्ट, टी-शर्ट आणि कुर्ते हँगरवर वाळत घातल्यास त्यांना चांगला आकार मिळतो. कपड्यांच्या पुढील आणि मागील बाजूला हवा खेळती राहते. हँगरमध्ये कपडे एकमेकांना चिकटणार नाहीत याची काळजी घ्या.
८. घरात वाळवताना हवा खेळती ठेवा: थंडीत कपडे घरात वाळत घालावे लागतात. मात्र बंद खोलीत जास्त कपडे वाळत घातल्यास हवेतील ओलावा वाढू शकतो. त्यामुळे खिडकी किंवा दरवाजा थोडा उघडा ठेवा आणि छोटा पंखा वापरा.
या ५ चुका टाळा
ओले कपडे एकमेकांवर टाकून ठेवू नका. कपडे पूर्णपणे न वाळताच कपाटात ठेवू नका. हीटर किंवा ब्लोअरच्या अगदी जवळ कपडे वाळत घालू नका, आग लागण्याचा धोका असतो. घरात कपडे वाळवताना खोलीत हवा खेळती ठेवा. कपड्यांना कुबट वास येत असल्यास ते पुन्हा धुऊन पूर्णपणे वाळवा.
Leave a Reply