एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडाच्या काळातील एका घटनेबाबत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिरसाट यांनी एका हिंदी पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सुरतच्या सीमेवरून परत येणाऱ्या एका आमदाराचा जीव गेला असता. त्यांनी मात्र त्या आमदाराचे नाव घेतले नव्हते.
या दाव्यावर ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी थेट पलटवार केला आहे. तो आमदार आपणच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता शिरसाट यांनीच याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे. या प्रकरणाची गृहखात्याने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.
मुख्यमंत्री चौकशीची हिंमत दाखवणार का?
पाटील यांच्या मते, त्या काळात सत्ता मिळवण्यासाठी जे प्रकार सुरू होते, ते शिरसाट यांच्या विधानातून समोर आले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी काही जण कोणत्याही थराला जाण्यास तयार होते, असे त्यांनी म्हटले. कुणाला थांबवले, कशासाठी थांबवले आणि कुणाचा जीव धोक्यात होता, या सर्व गोष्टींची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी त्यांची मागणी आहे. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने ते चौकशीची हिंमत दाखवणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पाटील यांनी सांगितले की, आपल्या जीवाला धोका नाही आणि त्यावेळीही भीती वाटली नव्हती. सर्वसामान्यांचा आणि तुळजाभवानीचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तक्रार करणार नाही, हळूहळू सर्व बाहेर येईल
इतके दिवस या विषयावर का बोलला नाही, असा सवाल पाटील यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितले की, आपण बोललो असतो तर विरोधक म्हणून बदनाम केल्याचा आरोप झाला असता. आता शिरसाट स्वतःच बोलत असल्याने काय घडले याचा अंदाज महाराष्ट्राला आला आहे.
पाटील यांनी स्पष्ट केले की, आज तरी आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन किंवा तक्रार करणार नाही. या विषयावर आपण उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो असून, ते ठामपणे आपल्या पाठीशी उभे आहेत. हळूहळू अनेक गोष्टी समोर येतील आणि सत्तांतरासाठी काय काय करण्यात आले, हे कळेल, असा दावाही त्यांनी केला.
Leave a Reply