बाईक टॅक्सी सेवेला विरोध करत महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांनी आज राज्यव्यापी बंद पुकारला आहे. या बंदामुळे मुंबईसह राज्यातील प्रवासी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये रिक्षा सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे अनेक रिक्षा रस्त्यावर धावताना दिसत आहेत, त्यामुळे बंदाबाबत चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे.
पुण्यात निदर्शने; रिक्षा बंद राहणार
पुण्यात बाईक टॅक्सी धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज सकाळी ११ वाजता परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा आज बंद राहणार असल्याची माहिती रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांनी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक रिक्षा संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
चालकांच्या प्रमुख मागण्या काय?
आवश्यक परवानग्यांशिवाय बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचा संघटनांचा आरोप आहे. बाईक टॅक्सीमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. याशिवाय सीएनजी दरवाढीमुळे रिक्षाचालकांवर आर्थिक भार वाढला असून, रिक्षांच्या मीटर भाड्यात वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.
Leave a Reply