नवी मुंबईच्या वाशी भागात रविवारी रात्री उशिरा एका तेल कंपनीच्या गोदामात अचानक आग लागली. सेक्टर १८ आणि माफको मार्केट परिसरात ही घटना घडताच आजूबाजूला घबराट पसरली. थोड्याच वेळात आगीने इतके रौद्र रूप धारण केले की शेजारी असलेल्या प्लायवूडच्या कारखान्यापर्यंत आणि एका कुरिअर कंपनीपर्यंत ती पोहोचली. पहाटे दोन वाजेपर्यंत आकाशात आगीच्या उंच ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट दिसत होते.
आग वेगाने का पसरली?
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गोदामात आग लागली. तेथे मोठ्या प्रमाणात तेल आणि सहज पेट घेणारे पदार्थ साठवलेले असल्याने आग झपाट्याने भडकली. लाकूड आणि पॅकेजिंगचे साहित्य असल्यामुळे आग विझवणे अधिकच अवघड झाले. घटनेच्या वेळी परिसरातील काही रहिवाशांना स्फोटासारखे मोठे आवाज ऐकू आले, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सुट्टीमुळे मोठी दुर्घटना टळली
रविवारची सुट्टी असल्याने तिन्ही कंपन्यांमध्ये त्यावेळी कर्मचारी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून या आगीत कोणालाही इजा झालेली नाही, अशी माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. खबरदारी म्हणून आसपासच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जवानांनी सर्व बाजूंनी पाण्याचा मारा करत इतर औद्योगिक युनिट्सपर्यंत आग पसरण्यापासून रोखले आणि तासन्तास प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. तिन्ही कंपन्यांमध्ये साठवलेला लाखो ते कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस या घटनेचा संयुक्त तपास करत आहेत.
Leave a Reply