सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळाव्यात, असे वाटणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना नेहमीच लोकप्रिय राहिल्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत एकरकमी ठेवीवर केवळ व्याजातूनच पाच लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई होऊ शकते. ही सरकारी योजना असल्याने गुंतवलेल्या पैशांची सुरक्षितता सरकार स्वतः हमी देते, त्यामुळे ही जोखीममुक्त बचत योजना मानली जाते.
कालावधीनुसार व्याजदर
पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेत गुंतवणुकीच्या कालावधीनुसार वेगवेगळे व्याजदर दिले जातात. एक वर्षाच्या मुदत ठेवीवर 6.90 टक्के, दोन वर्षांच्या गुंतवणुकीवर 7 टक्के, तीन वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.10 टक्के आणि पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.50 टक्के व्याज मिळते. गुंतवणूकदार एक ते पाच वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ही योजना निवडू शकतो. फक्त 1,000 रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीसह खाते उघडता येते आणि यासाठी कोणतीही कमाल गुंतवणूक मर्यादा नाही. एकल किंवा संयुक्त खाते उघडण्याची सुविधा असून, जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते.
पाच लाख रुपये व्याज कसे मिळते?
या योजनेत एकदाच गुंतवणूक करून पाच लाख रुपये व्याज मिळवण्याचे गणित सोपे आहे. पाच वर्षांच्या कमाल मुदतपूर्ती कालावधीसाठी 11.5 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागते. 7.5 टक्के व्याजदराने मुदतपूर्ती झाल्यावर एकूण 16,67,440 रुपये मिळतात. या रकमेपैकी केवळ व्याजाचे उत्पन्न 5,17,440 रुपये असते. म्हणजेच, पाच वर्षांत व्याजातूनच पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम हाती येते.
या योजनेत चांगले व्याज मिळतेच, शिवाय गुंतवणुकीवर कर सवलतीचाही लाभ मिळतो. आयकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत कर लाभ मिळतो. त्यामुळे बचत करणाऱ्यांसाठी आणि कर नियोजन करणाऱ्यांसाठीही ही योजना फायदेशीर ठरते. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सध्याचे नियम आणि अटी तपासून घेणे योग्य राहील.
Leave a Reply